
श्री विरुपाक्ष मंदिर ( पट्टडक्कल )
प्रकृती ( शक्ती ) आणि पुरुष ( शिव ) या दोन्हींच्या खेळातून निर्माण झालेले विश्व; याची उपासना आपल्या भूमीत विविध पद्धतीने हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. आज आपण कदाचित पूर्णपणे त्याविषयी जरी जाणत नसलो तरीही ती कुठेतरी गुरु परंपरा, मंदिरे , उत्सव यांच्या रूपात प्रकट होते. नर्मदेपलीकडे दक्षिणापथात मंदिरांचे संवर्धन झाले. कारण मऱ्हाट देशीचे मरहट्टे छातीचा कोट करून आक्रमण रोखून उभे राहिले. त्यामुळे कोल्हापूरच्या खिद्रापूर पासून जो शिल्पकलेचा उत्सव चालू होतो तो रामेश्वरम आणि पद्मनाभ मंदिरांपर्यंत डोळ्यांचे पारणे फेडतो.

दुर्गा मंदिर ( ऐहोळे )
असेच बदामी,पट्टदककल आणि ऐहोळे येथे फिरताना ते सौंदर्य अनुभवता आले. त्यातील तीन शिल्पकृतींचे फोटोस येथे सादर करीत आहे. मानवी कला, राजाश्रय आणि निसर्गपुजन याचा सुरेख संगम येथे झाला. उत्तर आणि दक्षिणेतील कला येथे मिळाली आणि उदयास आली ती शिल्पशाळा ( शिल्पकलेची विद्यापीठ ) . त्यामुळे या पट्ट्यात अनेक सुंदर मंदिरे दिसतील. कलेची उपासना करणाऱ्यांनी मंदिरांवर अनेक देखावे कोरले. आजही अनेक मंदिरे उत्तम अवस्थेत आहेत. पण काही मात्र ज्याला देखावले गेले नाही आणि मनात हीनतेची भावना आली त्या आक्रमकांनी पैसे लुटताना खास वेळ काढून हातोड्यांचे घाव घालून ठरवून मंदिरे तोडली. तरीही अनेक मंदिरे उरली.

श्री भूतनाथ मंदिर ( बदामी ) त्यातील ही काही. प्रत्येक गोष्ट समजायलाच पाहिजे असा अट्टाहास नाही परंतु उत्सुकता मात्र नक्कीच हवी. कारण ठाम मत आपणास कट्टर बनवते तर उत्सुकता मानव. जगात जेवढी काही धर्ममते आहेत त्या विचारांना पुरून उरलेली भारतीय षडदर्शन नक्की वाचावे. आणि त्या सर्वांचे प्रतिबिंब मात्र निर्माण करावे ते फक्त कलाकारानेच. कोणी मग कविता करतो तर कोणी शिल्प. त्यामुळे भारत हा मंदिरांमधून दिसतो. जसे परदेशात आपण चर्च, मशिदी पाहताना हरवून जातो त्याही पलीकडे मानवी सौंदर्याच्या पुढे वैश्विक शक्तीचा खेळ हि मंदिरे आपल्याला दाखवत हळू हळू त्यांच्या गाभार्यात नेऊन शून्याचा अनुभव देत स्वतःशी जोडतात. म्हंटले तर कला, धर्म , उत्सव, परंपरा पण ठरवले तर मुक्तीचा मार्ग त्यांच्याच पायऱ्यांवरून जातो. आणि या देशात आपण सर्व मार्गांना मानून शेवटी सत्याप्रतच जाण्याचा प्रयत्न जन्मोजन्मी करतो.
लिखाण आणि प्रकाशचित्रे : योगेश कर्डीले
सर्व हक्क राखीव.
Comments