top of page
  • Writer's pictureYogesh Kardile

खजुराहो आणि भारतीय संस्कृती

Updated: Jul 3, 2022

भारतीय संस्कृती म्हंटले कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असेल तर ते म्हणजे हिमालय, सह्याद्री, समुद्र, येथली विविधता आणि मंदिरे. जगात सर्वात वेगळ्या पद्धतीची प्रार्थनास्थळे जर कुठे उभारली गेली असतील तर ती भारतातच. समुद्र किनाऱ्यापासून ते हिमालयाच्या पर्वत शिखरापर्यंत त्यांनी हा आसमंत व्यापला आहे. आणि त्यांचा हक्काचा देव जर कोण असेल तर तो देवाधिदेव महादेव. अगदी आदिम प्रकारच्या उपासना पद्धतीपासून साग्रसंगीत सोहळ्यापर्यंत त्याचे भक्त उपासना करीत असतात.

कंधरिया महादेव मंदिर


अशा या देशात मंदिर हि एक गोष्ट आहे जी भारतीय म्हणून आपणास नक्कीच अभिमानास्पद आहे. तुमचा धर्म आणि जात कुठलाही जरी असला तरी आपल्या पूर्वजांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे मंदिरे, बुद्ध विहार, जैन गुंफा यांना बांधण्यात आपले योगदान दिलेले आहे. त्यामुळे हि मंदिरे आपली सर्वांचीच आहेत. आणि या तिन्ही धर्मांची मंदिरे तुम्हाला एकाच जागी सापडतील. यापेक्षा धार्मिक सौहार्दतेचे उदाहरण दुरसे ते कोणते ?

सूर्यप्रकाशाची तिरीप


अशा वेळेस एक जागा अशी कुठली आहे जिथे जगभरातून लोक त्या मंदिरांच्यावर झालेले काम पाहायला येतात ? उदाहरणे तर भरपूर आहेत. तरीदेखील जगभरात खजुराहो हे नाव ऐकले कि सर्वांचे एकमत होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाचा उत्सव जेथे मंदिरावर शेकडो वर्षांपूर्वी ज्यांनी कोरून ठेवला ते पाहायला आजदेखील जगाच्या कानाकोपऱ्यात लोक येतात. म्हणजे नक्कीच काहीतरी तेथे असणार. मग एक भारतीय या नात्याने आपणदेखील पाहायला जायला हवे.


मंदिराच्या भिंतींवरील शिल्पे


साधारणतः भारतात नगरा , वेसर आणि द्रविड या तीन शैलीत मंदिरे बांधली गेली. उत्तरेत नगरा पद्धतीने मंदिरे बांधली जेथे मंदिरांचे शिखर हे दक्षिणेकडच्या गोपुरा पेक्षा वेगळे होते. मंदिर शैलींविषयी पुन्हा कधीतरी आपण नक्कीच बोलू.


सिंह आणि स्त्री


भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे सकाळी मंदिरात देवदर्शन घ्यायला जाणे. सकाम ( हेतू मनात ठेवून ) किंवा निष्काम ( निर्हेतुक ) पद्धतीने मंदिरातील देवाचे दर्शन घेणे ही क्रिया अनेक वर्षे अव्याहत चालू आहे. विश्वात्मक देव प्राणी, झाडे, निसर्गात पाहून त्याचे पूजन आणि उत्सव करीत असतानादेखील ज्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली अशा या मंदिरात सकाळची फेरी शहरी आणि ग्रामस्थ न चुकता करतात. हेतू काहीही असो परंतु माघारी येताना एक ऊर्जा घेऊन प्रत्येक जण परततो.

मंदिर शिखर


आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि अध्यात्माचा मेळ सहजगत्या घातला आहे. अवकाश, भूमिती, नाद, रूप, रस,गंध, संगीत आणि वैराग्य सर्वच एका ठिकाणी ! आणि तेही शिल्पांच्या द्वारे गोष्टीरूपात मंदिर प्रवेशद्वारापासून ते गर्भगृहापर्यंत. जेव्हा केव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा फक्त एक धार्मिक जागा म्हणून पाहण्यापेक्षा या सर्व गोष्टी पाहायला सुरु केले तर न जाणो अनेक गोष्टी उलगडतील. फक्त जमल्यास सकाळी जा. गर्दी अतिशय नगण्य असेल आणि सकाळच्या किंवा संध्याकाळच्या उजेडात मंदिराचे दगड सोनेरी दिसतात.

अंतर्गत कोरीवकाम केलेले छत


खजुराहो ही जागा चंदेल वंशीय राजांनी जगाच्या इतिहासात अजरामर करून टाकली. कुठलाही नेत्याचे मोठेपण त्याने जिंकलेल्या राज्यांच्या सीमेपेक्षा त्याच्या कार्यातून दिसून येते . विशेषतः न्यायव्यवस्था, शेतीविषयक धोरण, कलाकारांना आश्रय देणे इत्यादी. हि विशाल आणि सुंदर मंदिरे ते राजे आणि कलाकार गेल्यानंतर सुद्धा आपल्याला आनंद आणि खजुराहोवासीयांना रोजगार देताहेत. आपल्याला कलेतील किंवा धर्मातील काहीही कळात नसले तरीही सौंदर्यदृष्टी जन्मजात असते. आणि तिची वृद्धि करण्याचे काम आसपासचा परिसर व इमारती करीत असतात. मग त्या धार्मिक असो, राजकीय किंवा व्यावसायिक. राज्यकर्त्यांचा विवेक, दूरदृष्टी आणि कलाभिरुची पाहायची असेल तर त्यांनी बांधलेल्या इमारती, मंदिरे, रस्ते, आणि पूल पाहिल्यावर आपोआपच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. त्यामुळेच आपल्याला आपल्या जुन्या राज्यकर्त्यांचा अभिमान का आहे तर त्यांनी फक्त वर्तमानाचं नाही तर भविष्याचाही वेध घेतला होता.


खंडित मूर्ती


आणि उत्कृष्ट काम हे नेहमीच कालातीत, धर्म आणि जातीपलीकडे असते. त्याला कुबड्यांची गरज कधीच पडत नाही. तुटलेली मूर्ती देखील पूर्वीच्या सौंदर्याची कल्पना देते. म्हणूनच असे म्हणतात कि खजुराहोतील एकेक दगड गातो आणि नर्तन करतो. फक्त पाहणाऱ्याला दृष्टी हवी. म्हणूनच मला येथे बा. भ. बोरकरांच्या कवितेतील दोन ओळी येथे नमूद करू वाटतात.

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे , मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. आपण कल्पनाच करू शकत नाही कि किती शिल्पयोगी, त्यांचे शिष्य, मजूर यांनी कित्येक वर्षे येथे कार्य केले असेल. सौंदर्यासोबत नवरसांचा साक्षात्कार दगडांच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केला. निसर्ग, कला आणि अध्यात्म यांचा सुरेख संबंध जेव्हा एखाद्या कलाकारामध्ये होतो तेव्हाच त्यांच्या हातामधून साक्षात सरवस्ती आणि विश्वकर्मा बोलू लागतो.


कामशिल्पे


सर्वोच्च ऊर्जा कोणती असेल तर ती म्हणजे सृजनाची. शक्ती पासून या अथांग आकाशात सर्व तत्वांचा अवतार झाला आणि अनंत, अविचल अशा पुरुष तत्त्वासोबत ( शिव ) तिने निर्मिती सुरु केली. त्यामुळेच काम हा पुरुषार्थ मानला जातो. मग जी ऊर्जा अतिशय शक्तिशाली आहे तिला जाणून देखील घ्यायला हवे. त्यामुळेच तंत्रयोग या मार्गाचा वापर ऋषीमुनी करत होते.

वेगवेगळ्या पद्धतीने काम या पुरुषार्थापासून सुख, सृजन आणि मोक्ष कसा प्राप्त होईल यावर संशोधन हजारो वर्षे आपल्याकडे झाले त्याचेच काही अंश या मंदिराच्या भिंतींवर कामशिल्पांच्या रूपात आहेत.


कामशिल्पे


दुर्दैवाने ज्या देशात स्त्रियांना सार्वजनिक जीवनात मानाचे स्थान होते त्यांना मध्य आशियायी आणि युरोपियन आक्रमकांमुळे आपल्या इच्छा, आकांक्षा आणि काय बोलावे, काय वस्त्र घालावे यावर बंधने आली आणि आपण एका अंधाऱ्या युगात लोटली गेलो. तांत्रिक सुधारणा जरी झाल्या तरी मनातली जळमटे साफ करून त्या शिल्पांकडे निरागसपणे पाहण्याचा दृष्टिकोन गमावून बसलो.

शिल्पकृती


एखाद्या लहान मुलास किंवा प्राण्यास ती शिल्पे दिसली तरी त्यांच्याकरिता ती एकदम नैसर्गिक असतील. परंतु आपण मात्र आपल्यावर झालेली परकीय संस्काराचा परिणाम म्हणून त्याकडे अश्लील म्हणून पाहू. मनात एक विचार आला कामशिल्पे फक्त खजुराहोतच नाही तर भारतभर थोड्याफार प्रमाणात विखुरलेली आहेत. परंतु स्त्रियाची पहिली प्रतिक्रिया तोंडाला पदर लावणे, लाजणे हि असते तर पुरुष चावटपणे पाहत असतात. सुदैवाने आता या गोष्टी बऱ्याच बदलल्यात ( शहरी लोकांपुरत्यातरी ). परंतु मंदिरे हि फक्त धार्मिक विषय सोडून एक शिक्षणाची जागा म्हणून पाहायलादेखील हवी. पॉर्न पाहून मेंदूचा जो ऱ्हास होतो त्याऐवजी मंदिरे पाहून एक निकोप दृष्टिकोन सर्व समाजात येऊ शकतो. त्यामुळेच शिल्पे सर्व समाजाकरिता कोरलेली आहेत. लाखोंच्या संख्येने जेव्हा नग्न शिल्पे देशभर मंदिरांवर काढली गेली तेव्हा करोडो वेळा त्या शिल्पकारांनी त्याची प्रॅक्टिस केली असेल. लाखो मॉडेल्स देखील त्यांच्याकरिता असतील. नाहीतर कोणाला पाहून ते प्रॅक्टिस करणार ? म्हणजेच देशात कलेविषयी आणि नग्नतेविषयीचा दृष्टिकोन आज आहे तसा तर नक्कीच नव्हता.

वसुंधरा मंदिर परिसरात नृत्य करताना


भारतीय शरीरयष्टी, अलंकार, केशभूषा, निसर्ग, परदेशाशी होणार व्यवहार, युद्ध, संगीत, उत्सव हे सर्व या मंदिरांच्या चौफेर पहिले तर दिसून येते. जंगलाच्या मध्यभागी असलेले हे छोटेसे शहर भारतापेक्षा परदेशात खूप प्रसिद्ध आहे. तंत्र मार्ग, कामसूत्र, शिवभक्ती, पन्ना व्याघ्र प्रकल्प अशा एक ना अनेक गोष्टींसाठी खजुराहोच्या अभ्यासक येतात. येथे एक स्वतंत्र विमानतळ देखील आहे. राहण्याची उत्तम सोय, शाकाहारी जेवण, वर्षातून एकदा होणार उत्सव आणि संग्रहालय हे आहे. कलाकुसर केलेल्या वस्तू, कपडे, पुस्तके आणि अनेक गोष्टी येथे मिळतात. तुमच्याकडे हवेत किमान तीन दिवस. शांतपणे यायचे आणि एकेक मंदिर डोळ्यात साठवून घ्यायचे. विचार करायचा कि आपल्या पूर्वजांनी जगासाठी इतकी उच्च कलाकृती निर्माण करून ठेवली मग आपण जगासाठी छोट्याश्या प्रमाणात का होईना काही उत्कृष्ट निर्मिती सोडून जाऊ शकतो का ?

मोहरीची शेती

कामशिल्पे फक्त येथेच नाहींतर भारतभर विखुरलेली आहेत. साधारणतः १० टक्के कामशिल्पे आणि मग देवी देवता, योद्धे, राजे , सामान्य लोक, योगी , प्राणी आणि पक्षी या सर्वांना येथे भिंतींवर कोरलेले आहे . अतिशय बारकाईने केलेली शिल्पकृती आहे . उद्देश काय तर भौतिक आणि अध्यात्मिक आयुष्य कसे जगावे याचे शिल्परूपातले पुस्तक सामान्य लोकांकरिता खुले केले आहे . तंत्र मार्ग जो मोक्षाप्रती जाण्याचा एक मार्ग आहे त्याची उपासना आणि महत्व या मंदिरांवर आपणास दिसेल . लुप्त झालेल्या संध्या भाषेचा येथे वापर झाला आहे. चंदेल वंशीय राजांनी अनेक शिल्पायोगी लोकांमार्फत जगाला ही भेट दिली आहे . भारतीयांची उदासीनता आणि मुस्लिम आक्रमकांची धर्मांधता यामुळे मंदिरे क्षतिग्रस्त झाली. तरीही २५ च्या आसपास हिंदू आणि जैन मंदिरे अस्तित्वात आहेत.

शहरातील तलाव आणि मंदिर शिखर


मातंगेश्वर, चतुर्भुज , पार्श्वनाथ, वामन , ब्रम्हा, कंधारीया महादेव इत्यादी त्यातील महत्वाची मंदिरे आहेत . येथे जाणार असाल तर सहकुटुंब जा. आक्रमकांना नग्नता न समजल्याने त्यांनी मूर्तींची वक्षस्थळे तोंडली, नाक, हात आणि पाय कापले. तरी देखील हा ठेवा अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. जोपर्यंत आपणास आपली संस्कृती समजत नाही तोपर्यंत आपणास पुरुषार्थ कळणार नाही आणि देश तोपर्यंत उन्नत होणार नाही. मूर्तीवरचे अलंकार, कपडे, केशभूषा, पादत्राणे हे किती सुंदर असू शकतात याचा पुरावा तुम्हाला गवसेल. प्रणय, कामचेष्टा, वीररस, ध्यान, वैराग्य, धर्माचरण, मानव आणि प्राणी यांचा संवाद याशिवाय गंधर्व आणि यक्षगण हे देखील दिसेल.


मातीची भांडी


तुम्हाला मंदिरांविषयीची सखोल माहिती ऑनलाईन नक्कीच मिळेल. स्थानिक गाईड उत्तम माहिती सांगेल. येथे मला तुमच्याशी फक्त माझा दृष्टिकोन आणि अनुभव शेअर करायचा आहे. जमल्यास नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात जावे. वातावरण अतिशय छान असते. स्थानिक चाट, भोजनालय याचा आस्वाद नक्कीच घ्यावा. बद्री सेठ मारवाडी भोज येथे न चुकता जेवण आणि मिठाई खाण्यास जरूर जा. पश्चिम मंदिर समुहापासून चालत जात येते. कुठल्याही विक्रेत्याच्या जाळ्यात न सापडत स्वतः निवांत बाजारात फिरून वस्तूंच्या किंमतींची शहानिशा करावी. जमल्यास पुस्तके विकत घ्यावी कारण काही पुस्तके फक्त इथेच मिळतात. बऱ्याचदा जुनी पुस्तके देखील मिळतात. विशेषतः कला आणि धर्म अभ्यासकांसाठी दुर्मिळ पुस्तके येथे सापडतील. चारही दिशांना मंदिरे आहेत. एकेक करून ती पाहावी. जवळच रणेह वॉटरफॉल आहे. मोहरीची शेती तर अतिशय उत्तम असते. हिवाळ्यात गेलात तर ती संधी दवडू नका. अजून जर काही माहिती हवी असल्यास खाली कॉमेंट करा किवां संपर्क साधा. धन्यवाद.*मी मूर्तिकलेतील किंवा इतिहासतज्ज्ञ नाही . परंतु फिरता फिरता, वाचनातून आणि चर्चेतून देश समजावून घेण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी आहे .

Recent Posts

See All

2 Comments


dhiraj bhakre
dhiraj bhakre
Jul 08, 2022

ज्या पद्धतीने आपण आपल्या चित्रातून आणि लिखाणातून ( मराठी भाषेतून ) भारत देशातील संस्कृती , ऐतिहासिक स्थळ , निसर्ग यांच्याशी आमचं नातं जोडत आहात त्या साठी कर्डीले परिवाराचे मनापासून आभार

Like

Omkar Joshi
Omkar Joshi
Jul 03, 2022

अप्रतिम छायचित्र......मी हा अनुभव घेतला आहे. प्रत्येक भारतीयाने एकदा तरी ह्या मंदिराना भेट द्यायला

Like
bottom of page