top of page
Writer's pictureYogesh Kardile

गंगा आरती






वाराणसी, कशी आणि बनारस एकाच शहराला तीन-तीन नावे. जणू काही लाडाने आई आपल्या बालकाला वेगवेगळ्या नावाने हाक मारते अगदी तसे. अशा या शहराला एक बाजूने गंगा मातेने गवसणी घातली. सप्त सिंधूंमधील अतिशय महत्वाची नदी जिच्या काठावर हजारो वर्षांपासून काशी नगरी स्थापित झाली आहे. ज्या नगरीचे ऐतिहासिक, व्यापारी, कला, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व जगाच्या इतिहासात नमूद केले आहे. अशा या शहरी जगभरातील पर्यटक आणि भाविक एक गोष्ट पाहायला नक्की येतात. ती म्हणजेच गंगा आरती. या शहरातील ही एक एक अनोखी परंपरा.




गंगा आरती पाहणे हा एक अनुभव आहे. इतर ठिकाणी लोक भजन किंवा आरती ऐकायला जातात. येथे आरती पाहायला जगभरातून लोक येतात. हा नक्कीच हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवण्याजोगा अनुभव आहे. आरती साधारणतः रोज संध्याकाळी ०६:३० किंवा ०७:०० सुरु होते. साधारणतः ४५ मिनिटे हा सोहळा दशाश्वमेध घाटावर चालू असतो. कदाचित जो ती आरती रोज रोज पाहत असेल त्याला कंटाळवाणा असू शकतो. कोणाला ती शारीरिक कसरत वाटू शकते.



परंतु रोज सायंकाळी हजारोंच्या संख्येने जमणारे प्रवासी, साधू आणि भाविकांच्या डोळ्यातील भाव याविषयी खूप काही सांगून जातो. आरती पूर्वीची शांतता घंटेच्या आवाजा बरोबर गूढ होत जाते. एकामागोमाग लयीत होणारी हालचाल, मधुर आवाज, फुलांचा वर्षाव या सर्व गोष्टी बरोबर आरती ऐकणारे एका वेगळ्या काळात खेचले जातात. कपूर, अगरबत्ती, फुलांचा वर्षाव आणि नादमधुर संगीत यांचा मिलाफ ; एकाच वेळेस सुगंध, स्वर आणि रमणीय दृश्य यांचा एकत्रित कलात्मक व धार्मिक सोहळा म्हणजे गंगा आरती.



मानवी अस्तित्व या विश्वाचा एक भाग आहे. जे जल तत्व आपले पोषण करते, आपल्या शरीरात खेळते त्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे ही अंध श्रद्धा नसून वैश्विक विचार नक्कीच आहे. जलतत्वाला मातृ स्वरूप मानून आवाहन व पूजा करणे ही आपल्या पूर्वजांची आणि चालू ठेवणाऱ्यांची दृढ निष्ठा आहे. या कृतीद्वारे विनम्रता, भक्ती आणि अतीव आनंद सर्व भावना एकवटल्याचे जाणवते. भारतीय परंपरेने जर जगाला काही दिले असेल तर व्यक्ती विकास, स्वातंत्र्य यासोबतच निसर्गाच्या तत्वांमधील देवत्व उमजून ते प्रथा परंपरेच्या माळेत गुंफले.



त्यामागचा विचार जरी एखादे वेळी कळला नाही तरी आनंद म्हणून मात्र निश्चितच ही आरती अनुभवावी. अशीच आरती आम्ही ऋषिकेशला गंगाकाठी, चित्रकुटला मंदाकिनी च्या घाटावर, महेश्वरला नर्मदाकाठी तर राजमुंद्रीला गोदावरी किनारी अनुभवली. देश जरी विस्तीर्ण असला तरी त्याच्या अंतरंगातील भाव मात्र एकच आहे. एका लेखात, पुस्तकात किंवा एक जन्मात भारताला गवसणी आपण घालू शकत नाही. परंतु गंगा आरती सारख्या छोट्या छोट्या अनुभवातून भाव-रत तर नक्कीच होऊ शकतो.

वसुंधरा कपाळी चंदनाचा गंध आणि लेप लावून दशाश्वमेध घाटावर.

आपली मागची पिढी आपल्याला काही चांगले आणि काही दुर्दैवी गोष्टी पदरात सोडून जाते. ते सोबत घेऊनच कुठलेही कुटुंब, गाव आणि देश भविष्याकडे वाटचाल करतो. याच्या सोबतच जगभरातील व्यापारी किंवा बाजारू गोष्टींचे प्रभाव लहान पिढीवर पटकन होतात. आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो. मुलांना जमले तर वाराणसीला घेऊन जाणे किंवा आपल्या जवळील कुठल्याही नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आरती किवां उत्सव दर्शन करून आणणे. तसे नसेल तर जमल्यास स्वतः अशी आनंददायी परंपरा सुरु करणे.


क्लायमेट चेंज, नेचर कॉन्झर्वेशन, एन्व्हायर्नमेंटल ऍक्टिव्हिझम या फॅन्सी शब्दांची मग गरज पडणार नाही. कारण निसर्ग आणि आपण वेगळे नाहीच व ही संकल्पना या छोट्या गोष्टीद्वारे आपल्या पूर्वजांनी आपल्याला आरती सारख्या माध्यमातून दिलेली आहे. आणि जेव्हा आदर निर्माण होतो तेव्हा कृतीमध्ये जबाबदारीची भावना नक्कीच झळकते. नमामि गंगे !





94 views0 comments

Comments


bottom of page