काही वर्षांपूर्वी इंडोनेशीया या देशात कामानिमित्त जाण्याचा योग्य आला होता.
त्या देशाची राजधानी जाकार्ता येथे मुक्काम होता आणि हाताशी वेळ अगदी कमी होता.
परंतु नेहमीप्रमाणे कुठेही गेलो तरी काही नाही तरी संग्रहालय पाहणे मला आवडते.
त्यामुळे हॉटेलमध्ये विचारले असता तमान- मिनी या ठिकाणी जाण्याचा सल्ला मिळाला.
मग काय टॅक्सी करून तेथे गेलो. तेथे जाणवलेली विशेष गोष्ट म्हणजे हे एक थीम पार्क सारखे असून येथे तुम्ही संपूर्ण इंडोनेशियाची संस्कृती स्थापत्याच्या स्वरूपात पाहू शकतात. येथील वनवासीयांची घरे, त्यांची वाद्ये , कला, आयुधे , कपडे आणि बरेच काही. सोबतच कोमोडो ड्रॅगन देखील येथे आहे.
भारतीय संस्कृतीचा प्रभाव ( हिंदू , बुद्धिस्ट ) जो त्यांच्यावर पडला तो त्यांनी पुसून टाकण्याऐवजी संग्रहालयात मिरविला आहे.
यासोबतच लहान मुले मुली कुठल्यातरी स्पर्धेत रंगबिरंगी कपडे घालून नृत्य करीत होते. ते पाहिल्यावर मला मनात एक गोष्ट आली. धर्म जरी बदलला तरी त्यांना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान आजही आहे. इतकेच काय तर चिनी संस्कृतीला देखील त्यांनी येथे जागा दिली आहे.
इंडोनेशिया दोन दिवसात समजू शकत नाही. परंतु एक छोटी झलक देखील खूप काही सांगून जाते. जाकार्तानंतर काही वर्षांनी मला भोपाळ येथील मानव संग्रहालय आणि आदिवासी संग्रहालय पाहायला मिळाले. हि दोन्ही संग्रहालये देखील याचसारखी अतिशय सुंदर आहेत. आपल्या देशात तर अजून बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याचा प्रभाव मला येथे जाणवला. मग तो नारळाच्या पँनपासून केलेले डेकोरेशन केरळ तामिळनाडू ची आठवण करुन देते. तर येथील घरे ईशान्य भारताची. तर नृत्य मणिपूर आणि ओरिसाची. भारताने आपला प्रभाव अतिशय सुंदररित्या शेजारील देशांवर सोडलेला आहे. आणि त्यात स्थानिक रंग आणि बाज आल्याने अजूनच वैविध्य आलेले आहे.
Comments