top of page
  • Writer's pictureYogesh Kardile

तरंग, माया आणि चैतन्य

Updated: Jul 22, 2021आज संध्याकाळी फिरताना मन प्रसन्न झाले होते. आसमंतात मस्त वारा वाहत होता, एका लयीत निलगिरीचे झाडे डोलत होती. जणू काही समुद्रच्या लाटाच त्या झाडाच्या रूपात हेलकावे खात होत्या. अचानक हिरवेगार पाच सात पोपट उडत आले आणि दाट झाडीत गडप झाले .पावसाचे थेंब हळू हळू टपकत होते. डबक्यात तरंगांची नक्षी निर्माण करीत होते. कोपऱ्यावरच्या भिंतीवर वेलींनी आक्रमण केले होते आणि काही ठिकाणी तर भिंत जणू गडपच झाली होती. निसर्ग सगळीकडे आक्रमण करीत होता. हिरवा, पोपटी आणि अधेमधे काळ्या रंगांनी वातावरणाचे चित्र रंगले होते.

ढग एका लयीत आसमंत आक्रमित होते आणि डोंगरांची डोकी त्या पांढऱ्या दुलईत बुडाली होती. जोरकस वाऱ्यामुळे एक पक्षी आपल्या थव्यापासून मागे राहिला होता. पण तरीही पुढे जाण्याची जिद्दमुळे तो शेवटी क्षितिजापार गेलाच. वरवर पाहता या सुंदर दृश्यात विविधता असली तरीही एक समानता होती. झाडे, वेली, ढग, वारा, फुले या सर्वांमध्ये वाढत वाढत जाणारा एक क्रम किंवा नक्षी म्हणा दिसत होती.

चित्र : अनघा कर्डीलेज्याला आधुनिक विज्ञानात फ्रॅक्टलस ( सेल्फ रिपिटींग पॅटर्न्स ) म्हणतात. जे अनादी अनंत असतात. जसे वेदांतात म्हणतात प्रत्येक बीजामध्ये झाडाचा नकाशा दडलेला असतो तर विज्ञानात त्यालाच कोड म्हणते. या पावसात तो कोड किंवा सूत्रे सर्वत्र जोमाने कार्यरत असताना दिसली. ज्याला आपण रोमँटिक वातावरण म्हणतो ते म्हणजे एका विशिष्ट पद्धतीचे सूत्रे वारंवार कार्यरत होत विस्तारित होत जाणे. आणि एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होणे ज्यात मानवी मन प्रफुल्लित होते. अशी अवस्था जी आपल्याला हवीहवीशी वाटते. याप्रकारच्या अनुकूल वातावरणात प्राणिमात्रांची वृध्दी होते. तर नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी,ज्वालामुखी यामध्ये तीच सूत्रे शक्तिशाली पद्धतीने व्यक्त होतात. ती आपल्याला प्रतिकूल वाटतात कारण त्याने आपला संहार होतो.पायी फिरताना मन मात्र विचारात बुडाले होते कि हे सर्व कसे घडून येते ? याच्यामागे चैतन्याचे अस्तित्व असणे हि आपल्या पूर्वजांची श्रद्धा. या सर्व विश्वात शक्तीचा संचार चैतन्य रूपात होत निर्माण, पालन आणि संहार होत राहतो. आपण अनुकूल गोष्टीत सौंदर्य शोधतो तर प्रतिकूल गोष्टीपासून दूर पळतो. निसर्ग मात्र आपले कार्य इमानेइतबारे करीत राहतो.या विश्वाचे वर्षानुवर्षे गिरिकंदरात राहून निरीक्षण करणाऱ्या तपस्वी मुनींनी जे त्रिकालाबाधित सत्य शोधले तेच विज्ञान प्रयोगाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करते आहे. फरक फक्त इतकाच आहे कि विज्ञान त्यासाठी उपकरणांचा वापर करते तर साधुजन समाधिस्थ होऊन ज्ञानचक्षुंचा वापर करून.मला अचानक आठवले कि मी हा प्रकार अस्तित्वात नसून फक्त चैतन्य आणि माया यांच्या मिश्रणातून चाललेला हा खेळ आहे. थोडे थोडे समजते परंतु पटणे मात्र कठीण आहे. कारण या शरीर संवेदनांशी मन जोडले गेले आहे. मग प्रश्न असा पडतो कि निष्प्राण देहातून ती चैतन्याचे अस्तित्व जाते कुठे ? इतका सुंदर निसर्ग कसा खोटा असेल ? का बरे त्याला माया म्हणतात. विवेकानंदांनी योगाविषयी सांगताना म्हटले आहे कि निसर्ग हा मानवाला फक्त शिकविण्यासाठी असून त्याच्यातील चैतन्याची ओळख पटविण्यासाठी आहे. नाहीतर सर्वकाही का फ्रॅक्टलसचाच ( मायेचाच ) खेळ आहे. आत लिहिलेला कोड ( सूत्रे ) निसर्गनियमाप्रमाणे चालवायचा. मनाला वाटले म्हणून चार हात येत नाही किंवा पंख फुटत नाहीत. म्हणजेच प्रत्येक बीजात लिहिलेला कोड आपले काम चोख बजावतो . मग आपण नेमके काय करतो ?एक वीर्याचा थेंब आणि एक स्त्रीबीज यांच्या मिलनातून वाढलेला हा कोंब मनुष्य रूपात साकार होतो आणि म्हातारपणी राख होऊन किंवा जमिनीत मिसळून एकरूप होतो. मग मी कोठे जातो ? शून्यातून निर्माण झालेल्या आकाराचे अस्तित्व परत शून्यावर येते. विचारांच्या तरंगांवर आयुष्याचा डोलारा उभा राहतो. कोणी स्वप्न साकारते तर कोणाचे मोडते. परंतु तरंगांच्या या दुनियेत मायाच खेळात असते. आनंद आणि दुःख हे दोन्ही शेवटी दोन टोकाच्या लहरी. रंग आणि नक्षीचे एक अजब मिश्रण होऊन एक फुल बनते तर एक दगड. कोणी सुगंध देतो तर दुसरा पायाखाली टोचतो. सरतेशेवटी दोन्हीही निसर्गाचीच अभिव्यक्ती ; काळाच्या पटलावर नाशिवंत असलेली.शिव आणि शक्ती यांच्या मिलनातून झालेला स्फोट हे अनंत ब्रह्मांड विस्तारित पुन्हा एकवार शून्य होणार. पुन्हा नव्याने स्फोट आणि पुन्हा शून्य. काळाचा पट जरी आपल्या आकलनापलीकडे असला तरी या चिमुकल्या आयुष्यात त्याची अनुभूती या ऋतूंच्या द्वारे मात्र आपण नक्कीच अनुभवू शकतो. निसर्गाचे नर्तन कोणासाठी रोमान्स, तर कोणासाठी चिंब गोठविणारी संध्याकाळ तर एखाद्यासाठी वैश्विक अनुभूती. आयुष्य म्हणजे या तरंगत डुबक्या घेत असताना त्यांच्या पलीकडचे अनंत अनुभवणे होय. विचारांच्या पातळीवर जरी पटले तरी अनुभव आणि वर्तणुकीच्या पातळीवर जाण्यासाठी मात्र ही एक आयुष्यभराची लढाई आहे.लिखाण आणि प्रकाशचित्रे : योगेश कर्डीले
199 views0 comments

Recent Posts

See All

コメント


bottom of page