आदिशक्तीनं मांडलं स्थान
यमुनागिरी पर्वतावर ।
तक्तावर बसली लेवून अलंकार ।।
जशी ढगात वीज चमकली
नेसली पितांबर ।
नवलक्ष तारांगण भरपूर ।।
चंद्र - सूर्याचा हार लेली गळ्यावर ।।
कापली कुंकवाची चिरी हळदीच्या वर ।।
वामन राऊत ( तुळजा भवानी : रा चिं ढेरे )
नर्मदा पूजन | पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर निर्मित नर्मदा घाट ( महेश्वर )
या विश्वाची नियंती जिला सांख्य योग प्रकृती म्हणतो तिलाच कोणी शक्ती, चित्त शक्ती, आदिमाया, कुंडलिनी, दशमहाविद्या देखील म्हणतो. तिचा संचार संपूर्ण विश्वात असल्याने जीवनाचा खेळ चालू असतो. तर शिव तत्व ( महा काल) वेळ आल्यावर आपला प्राण हरण करून नव्याने डाव मांडला जातो. या सर्व गमतीत आपण जिच्या आधारावर जगतो, स्वप्ने पाहतो ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली जगन्माताच असते. वेगवेगळ्या स्वरूपात ती आपल्या समोर येते. आपल्याला आईचा शांत आणि सर्व चुका पोटात घालण्याचा भाव जास्त प्रिय असल्याने आपण जिथे आपले लाड होतात, शांतता मिळते तिला मातेची उपमा देतो. मग ती नदी असो, धरणी असो, देश किंवा स्त्री. परंतु नात्यांच्या पल्याड आईभाव हा आपले प्राण हरण करणाऱ्या काली मध्येदेखील असतो. आपल्या चुकांची शिक्षा देणारी शिक्षिका असो किंवा जन्म देणारी आई, मायेची पांघरून घालणारी आज्जी, दूध देणारी गो माता, अन्न देणारी धरणी तर पाणी देणारी नदी. ही सर्व त्या मातेचीच संपन्न आणि प्रेमळ रूपच आहे.
वेरूळ लेण्यातील शिल्प
परंतु त्या सर्वांचे जेव्हा शोषण सुरु होते तेव्हा तिने आपल्या नसानसांत दिलेल्या शक्तीचाच आपण दुरुपयोग करीत असतो. मग मात्र ती आपल्याला विनाशकारी पूर रूपात भेटते, भूकंप आणि भूस्खलनाने घरे उध्वस्त करते, दूषित पाण्याने किंवा पाण्याच्या अभावाने आपण आजारी पडतो, रसायनांच्या मिश्रित दूध आणि भाजीपाल्यामुळे कॅन्सरपीडित होतो तेव्हा तिचे ते उग्र रूप आपला विनाश करून नवीन रचना करीत असते. असो ! अशावेळी तिच्यात प्रतीची कृतज्ञता जर मला नम्र बनवीत असेल तर तिची पूजा सर्व रूपात करणे योग्यच नाही का ? चित्रे, शिल्पे, कवने ही तिला एक आकार देतात जो आपल्यासारख्या पामरांना आपल्या मर्यादित दृष्टीतून समजून घेता येतो. या सर्व वर्णनाच्या खूप पलीकडे असलेली ती आपले बोबडे बोल ऐकून आनंदित होत असेल कि नाही हे सांगू शकत नाही . परंतु यापासुन आपण मात्र आनंदित होतो हे नक्की.
कोपेश्वर मंदिरावरील कलाकृती
सत्व रज आणि तमस, साकार आणि निराकार यांच्या पलीकडे शाश्वत असलेली शक्ती आपण सर्वात सुखकारी रूपात म्हणून मातृशक्तीच्या रूपात कल्पिली. परंतु अनकूल आणि प्रतिकूलतेच्या पलीकडे असणारी ही जगन्माता त्रिकालाबाधित असून आपल्याला या विश्वात तिचा अविष्कार जेव्हा दाखविते तेव्हा तो आपल्या इंद्रियांच्या मर्यादेतच आपण अनुभवू शकतो. त्यामुळे जे योगी स्थळ काळाच्या मर्यादा उल्लंघून आपल्या तृतीय नेत्राने तिचे दर्शन करतात तेव्हा त्यांच्यावर विसंबून आपण त्यांच्या मार्गदर्शनाने फक्त भक्तीच करू शकतो.आपले पूर्वज अंधश्रद्धाळू होते, दगड पुजायचे, भोळे होते त्याही पेक्षा महत्वाचे कि ते आपल्यासारखे दांभिक आणि अहंकारी नव्हते. विज्ञानाच्या नावाखाली तंत्रज्ञानाचे गुलाम नव्हते. जगाच्या पाठीवरच्या पहिल्या मानवापासून ते आत्तापर्यंतच्या सर्वांच्या त्यागाचे फलित म्हणजे आपले सुखकर जीवन. मग अशा अवस्थेत पुढच्या पिढीला जर काय देऊ शकलो तर विनम्रता आणि सर्व प्राणिमात्रांमधील आईला ओळखून पुत्रवत भाव ठेवला कि आपण जगात सर्वात श्रीमंत होऊ.
वेरूळ : कैलासावरील शिव पार्वती आणि दशग्रीव
भारतवर्षात मुक्त भ्रमंती करताना अनेक राज्यात निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित सौंदर्य स्थळे पहिली. तेव्हा विचार यावयाचा आपल्याकडे अजिंठा, वेरूळ आणि खिद्रापूर यासारखी मोजकीच ठिकाणे आहेत. मग आपले योगदान या देशासाठी नेमके काय ? त्याची उत्तरे पुढच्या लेखात कधीतरी नक्की. परंतु एक गोष्ट मात्र खात्रीने माहित होती या राष्ट्रास तारण्यासाठी वीर भक्ती जर कोणी केली असेल तर ती महाराष्ट्राने. जिच्या प्रेमामुळेच आपले भरण पोषण होते. म्हणून निर्गुण निराकार शक्ती तत्वाची आई रूपात उपासना करीत आपल्याकडे तिची अनेक मंदिरे आणि उपासना स्थळे उभी राहिली. त्यात माहूरगड, तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंगी ( वणी गड ) सारखी साडेतीन शक्तिपीठे याशिवाय प्रतापगडावरची भवानी, गावोगावच्या मावलाया ( सप्त मातृका ), काळू आई, कोणी मा-काली या रूपात केली. आणि यांचे वैशिष्ट्य असे कि देवीचे भक्त मरहट्टे (सर्व मराठी समुदाय ) देवीची शक्ती समजून भक्ती करीत असल्याने चहूदिशांनी या पवित्र देशासाठी आपले बलिदान देण्यासाठी हा भोळाभाबडा पण कणखर समाज मागे हटला नाही. नुसतीच अंध भक्ती नसून त्यांनी आपले रक्त रणभूमीवर सांडून शेती, बायका, अबाल वृद्धांना आणि आपल्या मंदिरांना त्यांनी अभय दिले.
धर्माची दृढ कास जे धरुनियां शास्त्रां करी योजिती
निष्ठा देवपदी वसे स्थिर , नसे भाव जयांच्या मिती ;
ज्यांच्या ती परिरक्षण निशिदिनीं जागे भवानी खडी
ऐसे धार्मिक वीर कोण जगतीं ? आम्ही मराठे गडी !
महाराष्ट्रवीरदर्श ( राधारमण )
कोपेश्वर मंदिर ( खिद्रापूर )
मग अशावेळी मनात विचार येतो ; आपण खरेच का एकट्याने स्वतःला घडवितो ( सेल्फ मेड ) ? तिची मदत असल्याशिवाय साधा श्वास देखील आपण घेऊ शकत नाही. पहिला घास एक आई भरविते, दुसरी शाळेत शिकविते तर अनेक ठिकाणी आयुष्यभर ती आपले रक्षण सदोदित करीत असते. आपल्याला पोषण करणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त मातृभावच असतो. तिची भक्ती करणारा एक साधा व्यक्ती महाकवी कालिदास बनला, कोणी परमहंस संत, रामानुजन सारखा महान गणितज्ञ ; तर तिच्याच ( राजमाता जिजाऊ ) मार्गदर्शनाखाली छत्रपतींनी स्वराज्य निर्मिती केली. दक्षिण दिग्विजयसमयी राजांनी चेन्नईच्या काली मंदिरात देवीची पूजा केली हे आजही तेथील लोक अभिमानाने सांगतात. श्रीशैलमला देखील त्यांच्या आठवणी आहेत. उत्तर ते दक्षिण सर्वीकडे त्यांनी आणि त्यांच्या वारसांनी फक्त लोकांची शेती आणि घरेदारेच स्वतंत्र केली नाहीत तर मंदिरे देखील परधर्मीयांच्या ताब्यातून सोडविली आणि वेळप्रसंगी दुरुस्त केली. त्याचाच परिणाम आपल्याला भारतभर फिरताना उत्तम स्थापत्याची उदाहरणे अनुभवायला शिल्लक आहेत. वैयक्तिक जागा तर स्वतंत्र हव्यातच परंतु धार्मिक प्रसंगी आणि उत्सव प्रसंगी एकत्र येण्याच्या जागा देखील स्वतंत्र हव्यात याचा विचार या महाराष्ट्रातील पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी सखोल केला आणि त्याकरिता आयुष्य वेचले.
आशापुरी माता ( मंदिर परिसर )
अनादी अंबिका भगवती । बोध परडी घेऊनि हातीं ।
पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ।।
गोंधळ येई वो जगदंबे । मूळपीठ तू अंबे ।।
व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताती सोहंमेळी ।
द्वैतभाव विसरुनी बळी । खेळती आंबे तुझे गोंधळी ।।
मुकुटमणी पुंडलिक । तेहतीस कोटी देव नायक ।
गोधंळ घालती सकौतुक । एका जनार्दनीं नाचे देख ।।
एकनाथ महाराज
महाराष्ट्रातील सर्व साधू संतांनी निव्वळ निष्क्रिय भक्तीच केली नाही तर लोकांना आयुष्यात कार्यप्रवण आणि दुष्टांना प्रतिकार करण्यासाठी देखील शक्तीची आराधना केली. जगद्गुरू तुकाराम महाराज , संत रामदास आणि त्यांच्या अनेक समकालीन संतांनी तिची करुणा भाकली. मनगटात बळ येण्यासाठी मनाची मशागत अध्यात्मातून केली त्याचाच अनुकूल परिणाम स्वराज्यासाठी झाला.
मातृका शिल्प बटेश्वर
आपल्या समाजाची ओळख सिंधू संस्कृती काळापासून नव्हे तर त्याच्याही आधीपासून आणि देवता कोण असेल तर ती मातृ देवता होती. आजही गावाकडे साती आसरा ( सप्त मातृका ) यांची पूजा बहुजन समाज करतो. देवीच्या यात्रा आणि जत्रांना जातोच. परंतु मातृभक्ती करणारा हा समाज जेव्हा एककल्ली झाला तेव्हाच त्याचे अधपतन सुरु झाले. कोणी त्यांना चेटकीण म्हणून जाळले तर कोणी आपल्या पेक्षा कमी समजून घरात डांबले. हुंडाबळी, आत्महत्या या अनेक गोष्टींना जबाबदार मातृशक्तीकडे एक वस्तू म्हणून पाहणे या वृत्तीमुळे झाले. जिथे स्त्रियांचे दमन केले जाते त्या ठिकाणी संस्कृती भ्रष्ट होते आणि कालपरत्वे त्यांचा नाश होतो. शिव आणि शक्ती यांना पुजताना आपण त्या तत्वांना समजून घ्यायला विसरलो. चैतन्याचा संचार करणारी शक्ती ही फक्त आपल्या आईत नसून सर्व स्त्रियांमध्ये आहे हे विसरून आपली भक्ती एकाच स्त्रीत ( आई ) केंद्रित केली. तर दुसरीला त्रासच दिला. तिची शक्ती कुठल्या नात्यावर आधारित नसून तिच्या अस्तित्वात आणि कृत्यात आहे हेच आपण विसरलो. सुदैवाने पुन्हा एकदा आपण आपल्याच इतिहास आणि परंपरांकडे नव्याने पाहत आहोत. भक्ती- शक्ती आणि विज्ञान हे एकत्र चालत आहेत.
कमळजा माता मंदिर आणि पाळणा ( लोणार )
आमच्या अनेक वर्षांच्या प्रवासात अशा अनेक माता, भगिनी आणि मैत्रिणी भेटल्या ज्यांनी वात्सल्य भावाने आम्हाला कधी पंच पक्वान्न खाऊ घातले तर कधी त्यांच्या घरी आसरा दिला तर कोणी योग्य मार्गदर्शन केले. बहुतांश स्त्रिया या गावाकडच्या होत्या पण वात्सल्य भावात खूपच वरच्या पातळीवर होत्या. तो भाव कुठलेही नाते नसताना आपोआपच तयार होतो. त्याला नाव द्यायलाच पाहिजे असे नाही. तुम्हालाही असे अनुभव प्रवासात, ट्रेक करताना किंवा अगदी कुठेही नक्कीच आले असतील. पण हा योगायोग नसून निसर्गाचा स्थायीभावच आहे. आपल्या देशातील वर्षानुवर्षे उन्नत झालेल्या संस्कृतीचेच स्वरूप म्हणून या देशातील स्त्रिया वात्सल्य भावनेने ओळखीच्या किवां अनोळखी पाहुण्यांची मदत करतात.
चौसष्ठ योगिनी मंदिर ( ग्वाल्हेर परिसर )
येथे पुरुषांनी पराक्रम गाजविला पण त्यांना त्यासाठी प्रवृत्त आणि घडवले ते या आदिशक्तीनेच. महाराष्ट्राकडे जर पाहायचे झाले तर सावित्रीबाईंनी शिक्षण खुले केले , अहिल्या बाईनी धार्मिक स्थळे सुधारली , ताराराणींनी असुरी वृत्तीच्या आक्रमकांचा शेवट केला, लक्ष्मी बाईनी यवनांविरुद्ध बंड पुकारले, जिजाऊंनी स्वराज्य निर्माता आपल्याला दिला. हे सर्व शक्तीच्या कृपेमुळेच. आज जरी आपण मानसिक गुलामीचे असलो तरीही महाराष्ट्रीय स्त्रिया यांना पहिल्यापासून निर्मिती आणि रक्षण या दोन्ही पातळीवर महान कार्य करून देशासाठी भरीव कार्य नेहमीच केले . आणि त्यासाठी कुठेतरी आपली वीर भक्ती ( शक्तीची ) कारणीभूत आहे. मग ती शंभू महादेव असो नाहीतर मातेची. येथील स्त्रियांमध्ये देखील तो वात्सल्य आणि वीर भाव उतरला. आपल्याकडे जोहार ( आत्मदहन ) ही परंपरा त्यामुळेच नसावी. किंवा अचानक कुठे गुप्त होऊन कथारूपात देवी बनणे याऐवजी येथील स्त्रियांनी जिवंत राहून आणि लढून देश आणि धर्म वाचविला. त्यामुळे जगन्मातेचा अंशच त्यांच्या रूपाने या देशाला तारले. कारण अध्यात्म आणि व्यवहार याची उत्तम सांगड आपल्या पूर्वजांना उत्तमरीत्या ठाऊक होती. म्हणून महाराष्ट आणि महाराष्ट्राच्या शक्तिपीठांचे महत्व देशासाठी अनन्यसाधारण आहे.
शैवमती तू भवानी । मध्वान्स वैष्णवी नारायणी ।
शारदा म्हणती गाणपत्य । शक्तिरूप ध्याती शाक्त ।
भोळ्या भाविक वारकऱ्यांप्रत । रुक्मिणी तू आदिमाया ।।
जेथें ब्रम्ह शक्ती तेथं । हा वेदांताचा सिद्धांत । तुह्या साहाय्यावीण सत्य ज्ञान ब्रम्हाचे होईना ।।
दासगणू
अनेक संदर्भ ग्रंथ, अनुभव आणि प्रवासातून स्फुरलेले हा लेख. काही चुकले असल्यास नक्कीच मदत करावी.
जेणेकरून आपली संस्कृती अधिक चांगल्याप्रकारे संवर्धन करू. आदिशक्तीच्या चरणी ही शब्द आणि छायाचित्ररूपी सेवा अर्पण.
शब्द आणि छायाचित्रे : योगेश कर्डीले
मॉडेल : रागिणी कर्डीले
सर्व हक्क राखीव
Comments