भटकंती हा शब्द ऐकायला मस्त वाटतो ना ! आपल्याला पण जिप्सी, बंजारा हे टायटल स्वतःला लावायला कुल वाटतात.
पण जरा विचार करा कि वर्षाची १० महिने फक्त फिरायचे. एका शेतातून दुसऱ्या, मग कधी जंगले तरी कधी गवताळ कुरणे. कधी गार वारा अंगाला स्पर्श करून जाईल तर कधी उष्ण हवेच्या लाटा डोके सुन्न करून सोडेल. थंडी आणि पावसाचे तर विचारूच नका.
शेतातील वस्ती
धनगर कुटुंब सह्याद्रीच्या डोंगररांगा, पठारे आणि कोकण अशा वारी करीत असतात. वर्षानुवर्षे तेच रुटीन. निसर्गावर अवलंबून असलेले. त्यामुळे निसर्गाच्या सर्वात जवळचे असतील तर तेच. आणि त्यांचे अखंड सोबती मेंढ्या, घोडे व कुत्रे. गेल्या कित्येक वर्षे अनेक धनगर कुटुंबियांच्या सोबत राहून कधी थोडावेळ गप्पा मारून तर कधी ओझरते भेटून अनेक गोष्टी उलगडत गेल्या.
शेत आणि मेंढ्या
त्यांच्या आयुष्याचे आकर्षण नेहमीच राहिले. सह्याद्री ते हिमालय या परिसरात त्यांचा संचार पहिला. नावे आणि पोशाख वेगळे परंतु पशुपालन आणि निसर्गात भटकण्याची वृत्ती तीच. अतिशय काटक, प्रेमळ आणि स्वाभिमानी लोक प्रत्येक वेळेस काहीतरी आपल्याला देऊन जातात. येथे मी महिन्यातील कडक उन्हात एका कुटुंबासोबत काही तास घालविले त्यातील एरियल छायाचित्रे.
मेंढ्या
लहानपणी मी राजीव राजळे ( राजूदादा ) यांच्याकडे पुस्तके आणायला जायचो. दरवेळी गेलो कि नवीन काहीतरी तो मला वाचायला किंवा ऐकायला द्यायचा. एकदा तो मला म्हणाला होता योगेश तुला जर खरेच काही समजून घ्यायचे असेल तर एखाद्या वयस्क धनगरबाबाला भेट. कदाचित तो जे सांगेल ते बरीचशी पुस्तके किंवां वक्ते देखील सांगू शकणार नाही. वाऱ्यामधला थोडासा बदल, ढगांच्या हालचाली , माणसाच्या डोळ्यांतील चमक यावरून येणाऱ्या गोष्टीचा अंदाज निसर्गाशी समरस झालेली माणसे खूप चटकन ओळखू शकतात. बऱ्याच वर्षांनंतर मी जेव्हा या निसर्गात वावरणाऱ्या लोकांना भेटतो तेव्हा त्याचे बोल किती खरे आहेत हे लक्षात येते.
नदीकाठी वाळायला टाकलेल्या गोधड्या
तरुण पिढी
धनगर बाबा : कुटुंब प्रमुख
बाभूळ
शब्द आणि लेख : योगेश कर्डीले
सर्व हक्क राखीव.
Comentarios