top of page
Writer's pictureYogesh Kardile

भारत आणि महादेव




महेश्वर मंदिर नर्मदा घाट, मध्य प्रदेश


देव आणि धर्म या संकल्पना जेव्हा अस्तित्वतदेखील नव्हत्या तेव्हापासून शिव आणि शक्ती ही तत्वे अस्तित्वात होती.

किंबहुना आपले मान्य व न मान्य करणे हे यत्किंचित आहेत. परंतु त्यांचे अस्तित्व ज्यांना या सृष्टीत जाणवले ते त्यांनी पुढच्या पिढ्यांना दाखविले. पशुपती, महादेव, शिव, भैरव, कालभैरव, शंकर, नीलकंठ, नटराज, भोलेबाबा, बाबा बर्फानी, महाकाल

अशा अनेक नावांनी हे विश्व व्यापी- तत्व या भारतभूमीत मंदिरे, उत्सव, कला आणि गोष्टी रूपात आपल्या समाजमनात कायमचे गुंफले गेले.


शिवलिंग आणि नंदी ( महेश्वर नर्मदा घाट, मध्य प्रदेश )


आपल्या देशाची ओळख कुठली असेल ती म्हणजे शिव आणि शक्तीची अफगाणिस्तान ते इंडोनेशियापर्यंत विखुरलेली मंदिरे. मग त्यात १२ ज्योतिर्लिंगे, पंच केदार, पंच कैलास अशी अनेक महत्वाची शिव मंदिरे आपल्याला माहित असतीलच.

भूत, भविष्य आणि वर्तमान , सत्व, रजस, तम् हे गुण, इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्या या संकल्पना ज्याच्या त्रिशूळावरी विराजमान आहेत. ज्याचे डमरू अनंताचे प्रतीक असून विश्वाची रचना आणि विनाश सतत करीत असते . असे हे शिव तत्व साकार स्वरूपात सामान्यांसाठी योगी लोकांनी शिवालयाचे स्वरूपात जगभर स्थापित केले. उद्देश एकच जे पिंडी तेच ब्रह्मांडी याची ओळख व्हावी. अनुकूल आणि प्रतिकूल या संकल्पांच्या पलीकडे स्वतःतील आणि विश्वातील शिव तत्व समजून घ्यावे. साकार आणि निराकार हे वेगळे नसून एकच आहे हे समजावे.


कैलास लेणी ( वेरूळ )

आज महाशिवरात्र आणि त्यानिमित्ताने गेल्या पंधरा वर्षातील प्रवास आठवला तर बहुतेक मंदिरे जी आम्ही पहिली त्यात सर्वात जास्त असतील ती भगवान शिवाची होय.रामेश्वरम पासून ते काश्मीर मधील नारानाग येथील मंदिर असो. कदाचित जुन्या काळात सर्वसामान्य समाज, व्यापारी, योगी आणि राजे लोक या सर्वांनी आपली संस्कृती शिव मंदिरांना केंद्रीभूत मानून ठेवली असेल.


हरिश्चन्द्रेश्वर मंदिर ( हरिशचंद्र गड : नगर )


कारण कुठल्याही दुर्गम गावापासून ते शहरापर्यंत जा तेथे गावासाठी एक शिव मंदिर असणारच. मग तामिळनाडूचे बृहदेश्वराचे किंवा वेरूळचे कैलास लेणे असो. भारताचा कल्पनाविलास, कलेचा सर्वोच्च उत्कर्ष, समाजजीवनाचा केंद्र बिंदू, व्यापारी मार्गावरील लेणी, गुहा, किल्ल्यांवरील मंदिरे, बर्फाच्छादित शिखरांवरील मंदिरे नाहीतर रमणीय समुद्र किनारे येथे सर्वत्र या समाजाने शिवाचेच प्रतिबिंब पहिले आणि पुजले. शिवाला सर्व प्रिय. ज्यांना समाजाने नाकारले त्यांना महादेवाने आसरा दिला. मग ते धोतऱ्याचे फुल, भांग, शिकारी किंवा दरोडेखोर असो. स्पृश्य अस्पृश्य ह्या संकल्पना येथे गळून पडल्या. तांत्रिक, अघोर, कापालिकांपासून ते समाजातील उच्चभ्रू सर्वांचाच तो आश्रयदाता.


दारासुरम मंदिर ( तामिळनाडू )

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति। तदहं भक्त्यु पहृतमश्नामि प्रयतात्मनः॥

भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे महादेवाला झाडाचे पान, फुल, फळ किंवा काहीही भक्ताने मला चांगल्या मनाने अर्पण केले तरी ते मी आनंदाने स्वीकार करतो. या वाक्यावर भोळ्या भाबड्या जनतेने विश्वास ठेवून आराधना केली.

महादेवाच्या मंदिरात त्यामुळे आजही कोणाला विशिष्ट वस्तू किंवा प्रसादाचे कधीच बंधन नाही. काही न घेऊन जाणाऱ्याला देखील येथे खूप काही मिळते.

श्रीखंड कैलास ( हिमाचल प्रदेश )


पुरुषत्वाचे प्रतीक ज्याला मानवी आकार नसून लिंगस्वरूपात पूजिले. ज्याच्या मंदिराबाहेर या देशाचा अन्नदाता नंदी कायम स्वरूपी वाट पाहतोय. अशी मंदिरे गावाच्या केंद्रापासून ते दुर्गम जंगलात उभी राहिली. आणि थकलेल्या, हरवलेल्या वाटसरूंना त्याने आश्रय दिला. इतकेच काय दरोडेखोरांपासून ते राजांपर्यंत सर्वांनीच या शिवालायचा आश्रय घेणे पसंत केले. ज्यांना लोकांनी टाकले, ज्यांना समाजापासून दूर जायचे होते ते सर्व या शिवाच्या आश्रयाला आले.


त्यामुळेच भुताखेतांपासून ते देवाधिदेव त्याला भोळा सांब म्हणत. त्याच्यासाठी सर्व समान. अशी हि शिवाची मंदिरे मग पडलेली जरी असली तरी ती आपलीशी वाटली.आमच्या सह्याद्रीतील बहुतांश ट्रेक मध्ये रात्रीच्या आसऱ्याचे ठिकाण हे शिवलायचं असायचे. मग ते अमृतेश्वर असो, हरिश्चन्द्रगड, वासोटा, भैरवगड, मधुमकरंद गड किंवा राजमाची. कितीही रात्र होवो परंतु मंदिरात निर्धोकपणे आम्ही निद्रादेवीच्या अधीन व्हायचो.


विरुपाक्ष मंदिर ( हंपी / विजयनगर : कर्नाटक )

आकार उकार आणि मकार यांच्या एकत्रित वैश्विक नादाचा ओंकारस्वरूप ध्वनी भारतभरातील शिवालयाच्या गर्भगृहात हजारो वर्षांपासून घुमतोय.आजही त्याच्या गाभाऱ्यातील घनगंभीर वातावरणात शून्यत्वाची प्रचिती येते. बाहेर कितीही उष्णता असो येथे मात्र कायमच थंडावा असतो. थकलेला जीव पुन्हा एकदा प्रसन्न होतो. भारतभरात शेकडो मंदिरे आम्ही पाहण्याचे भाग्य लाभले. प्रत्येक मंदिर हे कला आणि अध्यात्माचा एक अनोखे संगम असते. या महाशिवरात्रीमुळे पुन्हा एकदा तो छायाचित्रांचा संग्रह पाहताना वाटते कि आपण किती भाग्यवान आहोत.


कोपेश्वर मंदिर ( खिद्रापूर, कोल्हापूर )


आम्ही तुम्हाला आवाहन करतो कि आपण देखील बाहेर पडा आणि आपल्या जवळच्या मंदिराला या महाशिवरात्रीच्या निमित्ताने भेट द्या. कारण जेव्हा समविचारी व्यक्तींची ऊर्जा एकत्र येते तेव्हा निश्चितच चांगल्या गोष्टी लवकर साकार होतात. आणि हो तुम्ही जर आपला देश फिरून पहिला तर एक गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहणार नाही ती म्हणजे भारत आणि शिव हे वेगळे नसून एक आहे. हि भूमी शिव आणि शिव भक्तांची आहे.


टाकळी ढोकेश्वर लेणी ( पारनेर, नगर जिल्हा )


त्यामुळेच माणूस जगभर फिरला तर त्याला प्रवास म्हणतो परंतु भारतात फिरला तर त्याला मात्र तीर्थयात्रा म्हणतात. येथील प्रत्येक गाव, मंदिर, डोंगर, नदी हे तीर्थक्षेत्र आहे. ही तपोभूमी आहे योगी आणि शिव-शक्तीची.

हर हर महादेव !

281 views0 comments

コメント


bottom of page