top of page

मरहट्टा

  • Writer: Yogesh Kardile
    Yogesh Kardile
  • Apr 27, 2022
  • 4 min read

Updated: Jun 5, 2022


सह्याद्रीचा रक्षक


जेव्हा महाराष्ट्र देशातील धनदांडगे सुलतानांची चाकरी करीत आपल्याच बांधवांवर अत्याचार करण्यात धन्यता मानत होते. श्रेष्ठ कनिष्ठ यावरून जीवघेणे वाद होत होते. तेव्हा सोळा वर्षाचा नरसिंह शिवलिंगावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करतो. सोबत फक्त मूठभर रणमर्द घेत या भूमीच्या रक्षणास आयुष्य पणाला लावतो. माता आणि भवानीच्या आशीर्वादाने दुष्मनाला फाडतो. त्या भूमातेच्या सुपुत्राने ही भूमी ४०० वर्षांपूर्वी पेटविली. मरण आले तरी बेहत्तर पण या भूमीने भारतवर्षातील न भूतो न भविष्यती असा रणसंग्राम पहिला आणि तो वणवा देशभर पेटवून परकीयांचा नाश केला.


मर्दानी खेळाचा सराव

जेव्हा जेव्हा या भूमिपुत्रांवर भ्रष्ट लोक अन्याय करतील. तेव्हा तेव्हा शिव आणि शक्तिचा सुपुत्र पुन्हा या भूमीत अवतार घेईल. कारण ही भूमी आहे तप्त लाव्ह्यापासून तयार झालेल्या सह्याद्रीची. त्यातून निघणाऱ्या पाणी आणि पिकावर पोसलेल्या पोलादी मन आणि मनगटाची. देश आणि धर्मासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या मावळ्याची. तुमच्यासमोर घेऊन येत आहे एक दृक्श्राव्य संकल्पना मरहट्टा.

शस्त्रसज्ज


जगभरात आज जी कुठली संस्कृती म्हणून शिल्लक आहे ती एकतर आक्रमकांसमोर लढून टिकली किंवा स्थानिकांना नष्ट करून त्यांचे धर्मपरिवर्तन करून वाढली. इतिहास हा भूगोलामुळेच घडलाय.उगाच नाही छत्रपतींच्या एका हाकेवर सह्याद्रीतील शेतकरी शेती नांगरण्यासोबतच हाती तलवार घेऊन मायभूमीच्या रक्षणासाठी उभा राहिला.शिवछत्रपतींचे आयुष्य हाच आदर्श मानला तर इतर कोणाचीही विचारसरणी तुमची दिशाभूल करू शकणार नाही. मरहट्टा.

भगव्याच्या रक्षणास


हिंसा आणि अहिंसा याविषयावर जेव्हा जेव्हा लोक बोलतात तेव्हा मूळ गोष्ट समजून घेण्यास आपण कमी पडतो ते कि शस्त्र हे ना हिंसा करते ना रक्षा. शस्त्र हातात घेणारे मन आणि त्यामागचे विचार ती कृती करतात. ज्यांना शांतता हवी आहे तो समाज शस्त्रसज्ज हवा. अहिंसा ही शूरांनाच शोभते. धडधाकट व्याघ्र हरिणांसमोर अहिंसक एकवेळ होऊ शकतो. परंतु अहिंसक हरीण उपाशी वाघापुढे गेल्यास फक्त त्याच्या पोटात सामावू शकते. शांततेची भाषा केली तर शेवट हा वंशाचा समूळ नाश होतो.

योद्धा


समाजाला योध्यांची गरज का पडते? हा कदाचित आज आपल्यासाठी प्रश्न असू शकतो परंतु आजही जगभर त्यांनीच इतिहास घडविला आणि जगाचे नकाशे बदलले. ते चांगले कि वाईट याबद्दल दुमत असू शकते. शांतता ही दोन युद्धांच्या मधला एक काळ असतो. आणि ती शांतता टिकवून ठेवण्यासाठी तीच शांतता वीरांचे बलिदान मागते. कुठल्याही सुंदर आणि सधन राष्ट्रावर परकीयांची नजर असणे स्वाभाविकच आहे. जी काही युद्धे झाली ती याचसाठी.

मर्दानी खेळाची पहिली पायरी : लाठी काठी


आजही सर्वात सक्षम राष्ट्रेच आपला देश संरक्षित ठेवू शकतात. निसर्गात जर पहिले तर जीवो जीवस्य जीवनम हाच नियम लागू आहे. दुर्दैवाने मानवाची भूक ही न संपणारी आहे. योध्याला खरंच शांतता प्रिय नसते का ? त्याला भावना किंवा कुटुंब नसतात का ? किंबहुना त्याला तुमच्या आमच्या पेक्षा त्या थोड्या जास्तच असतील. मग तरीही तो हा मार्ग का निवडतो ?

एक योद्धा जो समाजाचे रक्षण करतो तर दुसरा आक्रमक जो इतरांची जमीन आणि संपत्ती हडप करतो ?


मर्दानी


विचार करा छत्रपतींनी जर सर्वसंग परित्याग केला असता तर ? त्यांना राजकारण, अध्यात्म, समाज या सर्वांची जाणीव लहानपणापासूनच प्रगल्भ होती. मग स्वतःचे संपूर्ण आयुष्य आणि पुढच्या पिढ्या देखील संघर्षासाठी का खर्ची घातल्या ?

ते कोणाविरुद्ध लढले ? किती किल्ल्यांवर रक्ताचे शिंपण झाले असेल ? किती बांगड्या फुटल्या, मुले अनाथ झाली असतील ? घरे, शेती जाळली गेली, मंदिरे आणि मुर्त्या फोडल्या असतील ? जेव्हा हे सर्व होताना जर प्रत्येक मावळ्याने विचार केला असता इतर लोक आहेत मी जर एकटा घरी राहिलो तर कुठे एव्हडा मोठा फरक पडतोय ? मग ही सेना उभी राहिलीच नसती. ज्याचा अभिमान हा मराठमोळा समाज मिरवतोय तो विषय देखील आपल्या मनात आणि ओठात आला नसता.


मर्दानी खेळ सराव


येथील स्त्रियांनी आत्मदहन करण्याऐवजी लढणे पसंद केले. कारण वंश आणि समाज सातत्य ठेवायचे असेल. मराठी बाणा आणि कणखरपण टिकवायचा असेल तर फक्त पुरुषच नाही तर स्त्री देखील तितकीच शक्तिशाली हवी. रानावनात राहणाऱ्या, शेतात गुढघाभर चिखलात काम करणाऱ्या, आपल्या शेळ्या मेंढ्यांसोबत दूरदूरवर एकांतात त्यांची राखण करणाऱ्या स्त्रिया शूर नक्कीच असणार. त्यामुळे या वीरमातांनी पुढची स्वाभिमानी पिढी घडविली. त्यामुळेच इतिहासकाळात घरोघरी शिवाजी राजे आणि शंभू राजे मुलांच्या मनामनात आणि मनगटात देखील होते.

फरी गदगा


कारण प्रत्येक आई ही राजमाता जिजाऊंच्या विचारांशी जोडलेली होती. युद्धात एकत्र लढून मरणे एकवेळ सोपे परंतु एकट्या माणसाने घरी कोणीही नसताना जमीन राखणे आणि पुढची पिढी तयार करणे म्हणजे प्रत्येक दिवस लढाईसारखाच. ती बाजू मराठी स्त्रियांनी सांभाळली. मुलगा असो कि मुलगी घरकाम, शेती आणि त्यासोबतच मर्दानी खेळ येथील सर्व मुलांना अवगत होते. त्यामुळेच एक गेला कि दुसरा पुढे तयार होत होताच.


ध्यानस्त


जो शांततेचा संदेश देतो तो संन्यासी देखील योध्दाच असतो तर जो शांततेसाठी स्वतःचे बलिदान देतो तो योध्या देखील संन्यासीच. दोघेही स्वत्व या शरीरापलीकडे आहे हे उमगलेले आत्मे असतात. आपण मात्र त्यांच्या बलिदानाची फळे चाखताना बेफिकिरीत जगतो. आजचे वर्तमान हे भूतकाळाची देणं आहे. तर आजचे कार्य उद्याचा येणार भविष्य ठरविणार आहे. या विश्वात पृथ्वी हा एक ग्रह आणि असे अगणित ग्रह या ब्रह्मांडात जरी असले तरी या पृथ्वी वरील छोटीशी जमीन आपले सर्वस्व आहे.आणि तिची प्राणपणाने रक्षा स्वतःसाठी आणि पुढच्या पिढीसाठी करणे हा आपला मानव धर्म आहे. गोष्ट इतकी सोपी आहे.


भविष्यासाठी सुसज्ज


जेव्हा यश आणि अपयश यापलीकडे जाऊन सार्वत्रिक विचार करण्याची कुवत येते तेव्हाच व्यक्ती जीवावर उदार होऊ शकते.

पुढच्या पिढीचा आणि आपल्या जमिनीचा विचार जेव्हा छत्रपतींनी या मावळ्यांच्या मनामध्ये रुजविला तेव्हा अनेक पिढ्या या महाराष्ट्राने युद्धत संपताना पहिल्या . ब्रिटिश विरुद्ध मराठा युध्यापर्यंत मराठे एकत्र लढले. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सुरु झालेला रणसंग्राम ह्या मावळ्यांनी अफगाणिस्तान ते बंगाल आणि खाली तामिळनाडूपर्यंत खेटविला.


जरा थांब !


अनेक सरदार घराणी या मातीत उदयास आली आणि पुढे भारतभर त्यांनी नाव कमविले. परंतु त्यांच्यासोबत लढणारे अगणित मावळे अज्ञात राहिले. अनेकांनी पानिपतला आपला देह ठेवला, कोणी खैबर खिंडीवर पहारा देत तेथेच संपला, तर कोणी बलुचिस्तानात कायमचे राहिले तर बरेचसे हरियाणामध्ये स्थिरावले. महाराष्ट्राबाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा त्यांच्या खुणा आजही अनेक ऐतिहासिक वास्तूंवर आणि समाजात दिसतात.


तीक्ष्ण नजर


शिकलेला किंवा अशिक्षित असो परंतु स्वधर्माचा आणि भारताचा एक राष्ट म्हणून विचार करणारा मावळा होता म्हणून आजही या देशाच्या खुणा आक्रमक पुसून टाकू शकले नाहीत. ज्ञान, व्यापार कला आणि धर्म यांची एकत्रित गरज कुठल्याही संस्कृतीला असते आणि त्यामुळेच ती फुलते. परंतु तिचे रक्षण करण्यास मात्र एका सैनिकाचीच निकड असते.

ज्याला आपल्या कुटुंबाचा, जमिन आणि वरील गोष्टींचा अभिमान असून त्याकरिता जीवावर उदार होऊन शस्त्र उचलतो तो सुसंस्कृत योद्धा नाहीतर स्वार्थाकरिता लढणारा फक्त एक रानटी.


त्वेष


त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली तरीही मनोधैर्य ढळू न देता, गनिमाची संख्या कितीही जास्त असू पण मातीत पाय रोवून उभा असणार तो मावळाच. राजा गेला, सरदार गेला, स्वतःचा मुलगा किंवा भाऊ धारातीर्थी पडला तरीही लढाई चालू ठेवत अंतिम श्वासापर्यंत लढणारा. त्यामुळेच मावळा म्हणजे फक्त एक तलवार धारण करणारा योद्धा नसून तो एक विचार आहे. ज्याला पेटविले आहे साक्षात शिव छत्रपतींनी. कित्येक पिढ्या आल्या नि गेल्या तो विचार मात्र तेवत राहिला. आपल्या मनामनात घर करून. गरज पडेल तेव्हा सर्व रान पेटवून देणारा. कारण उत्तम शेती करावयाची असल्यास कालांतराने शेतात निर्माण झालेली कीड पहिली जाळावी लागते.



संकल्पना आणि छायाचित्रण : योगेश कर्डीले मॉडेल : आकाश आवटे, रागिणी कर्डीले, विनायक सुतार आणि वसुंधरा कर्डीले मार्गदर्शन : शिवाजी राजे मर्दानी आखाडा, पुणे आणि श्री. राकेश राव, पुणे.

सहयोग : रुद्रा आर्टस्, पुणे रिटचिंग : यतीन शिंदे

कॅलिग्राफी : गणेश दुसुंगे

 
 
 

2 commentaires


Jaya sawant
Jaya sawant
05 juin 2022

अचूक आणि नेमक्या शब्दात मराठयाची यशोगाथा चित्रित रूपाने अजूनच मनोवेधक झाली आहे. हा दर्जेदार प्रयास यशस्वी झाल्याबद्दल योगेशजींचे आणि त्यांच्या सहकार्याचे मनपूर्वक अभिनंदन!

J'aime

Nitinb wagh
Nitinb wagh
05 juin 2022

खूपच चांगली संकल्पना आहे

J'aime

Join our mailing list

  • YouTube Social  Icon
  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Flickr Social Icon
  • Instagram Social Icon

© Raginee Yogesh Kardile

Any text / image / video from the site

must not be used without prior permission. 

bottom of page