• Yogesh Kardile

सिंधू सागर : कथा एका नदी आणि सागराची 

गङ्गे यमुने चैव गोदावरि सरस्वति

नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु


मी गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या नद्यांतील पवित्र जलास अवतीर्ण होण्याची विनंती करतो. कृपया माझ्या ओंजळीत पाण्यास शुद्ध करण्यासाठी प्रवेश करा.
हिंदू-स्थान, जगातील एकमेव भूमी जिची ओळख एका नदीच्या नावाने आहे. सिंधू पलीकडील लोकसंस्कृतीचे स्थान अगदी कन्याकुमारी पर्यंत. इतकेच काय तर पश्चिमेकडून ते दक्षिणेपर्यंत आपल्याला कवेत घेणारा सागर देखील सिंधू सागर. आणि त्याच्या पलीकडील महाकाय हिंद महासागर यांचे अस्तित्वदेखील जोडले गेलेय तिच्या नावाशी. प्राचीन काळापासून रोमन साम्राज्य आणि अरबस्थानाला या भूमीची भुरळ पडली ती आजतागायत. जिच्यामुळे या भूमीला आकार आणि सौंदर्य प्राप्त झाले त्या सिंधूला प्रकाशचित्र आणि शब्दांच्याद्वारे वंदन. भर पावसाळ्यात सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून ते कोकणातील समुद्रकाठांवर साकारलेली प्रकाशचित्रे तुमच्या समोर सादर करीत आहोत. 


योगेश कर्डीले : प्रकाशचित्रकार आणि लेखक 

रागिणी कर्डीले : मॉडेल, फॅशन स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्टआकाशात तरंगत असलेला एक थेंब जोरात जमिनीवर येऊन आदळतो, फुटतो मग अजून थेंब त्याचा पाठलाग करीत एकामागोमाग येतात. काही उध्वस्त होतात . काही जमिनीत खोलवर मुरत जातात. आणि थोड्यावेळात त्या दगडांतून पाझरायला सुरु होतो एक झरा. वाट मिळेल तसा तो पालापाचोळ्यासोबत घेऊन वाहत जातो. योग्य वेळ आल्यावर खोल दरीत स्वतःस झोकून देत नदीच्या रूपात जन्म घेतो.अगोदरची अवखळ नदी मग शक्तिशाली बनते. मार्गात येणारे दगड धोंडे काळानुसार मऊ गोटे बनतात. जे अडून राहतात त्यातले काही चुरा होऊन रेतीत रूपांतर होतात. ती मात्र वाट काढीत पुढे जाते. सृजनाची जननी, विनाशकर्ती, अवखळ सुंदरी, शांत धीरगंभीर नायिका या सर्व खेळात ती मात्र झेप घेते स्वतःच्या मूळ स्वरूपात सामावून जाण्यास. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना आपल्या मांडीवर खेळविणारी सिंधू .उत्पत्ती : दूरवर समुद्राच्या गर्भातून एक चैतन्याने भरलेला थेंब आकाशाकडे झेप घेतो. तो एक थेंब अगणित थेंबांमध्ये सामावून बनतो उरात धडकी भरविणारा शक्तिशाली कृष्णमेघ. उरातील ऐरावतासारखी अस्वस्थताएवढी कि केव्हा एकदा पर्वताच्या छाताडावर टक्कर घेतो ! सोबत तितकाच उतावळा असणारा साथीदार वायुराज ; सुरु होतो पूर्वेकडील प्रवास.खवळलेल्या समुद्र लहरींच्या धडाका काळजाचा ठोका चुकवितात. पण छातीचा कोट करून उभे असलेले तटरक्षक प्रस्तर माघार कसे घेणार ? समुद्रास ठाऊक असते या भूमीला उल्लंघून जाण्याची वेळ आजतरी आली नाहीय. परंतु त्याचे मेघरुपी अस्तित्व केव्हाच पृथ्वीवर वर्षारूपात उतरलेय.मेघांच्या या गर्दीत शिगेला पोहचलेली उत्सुकता प्रकर्षाने जाणवते. वने देखील अगदीच सतर्क झालीयेत. फांद्यांनादेखील अंगावर शहारे आलेत. पक्षी आणि प्राणी दडून बसलेयत पण चातक मात्र वाट पाहतोय त्या पहिल्या थेंबाची तर इकडे मोर आपल्या पंखांना सावरून टकमक वाट पाहतोय.गडगडाटी मेघ पर्वतावर टक्कर घेतात, दूरवर कोठेतरी चैतन्याची साक्षी विद्युल्लता प्रकट होते. धोधो पावसानंतर आसमंत धुक्यात लपेटून जातो. आणि या धुक्यात लपेटलेल्या वनामध्ये वारा मात्र शीळ घालत खुणावत राहतो.माया: आपल्या आसपास सर्वत्र तिचेच वास्तव्य असते. प्रत्येक थेंबाथेंबात चैतन्य असून देखील लपलेले. एकाचाच खेळ वेगवेगळ्या रूपात, कधी धुके, पाणी तर कधी आपल्या सर्वांगात नसानसांमधून उसळणारे.


सागरातील पाण्याचे सृजनाचे नाट्य जमीन आणि आकाशात सुरु झालेय. पाने, फुले, फांद्या आणि त्यावर आलेल्या शेवाळावरदेखील.प्रलय : महादेवाच्या डमरूचा नाद पाण्याच्या त्या प्रत्येक थेंबातुन ऐकू येतोय. शुभ्र परिपूर्ण, निर्माण आणि विनाशकर्त्या निसर्गापुढे सर्व विचारांची आवर्तने थंडावलीयेत. ना आकाशाची जाणीव, ना जमिनीचा थांगपत्ता. प्रलयाची हि कदाचित छोटीशी चुणूकच जणू . मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना समूळ संपवून टाकणारी शक्ती देखील सिंधूच. तिच्या या उत्सवात सर्व जंगल जणू नर्तन करतेय. सोसाट्याचा वारा दाट जंगलातून ढोल बडविल्यासारखा धावतोय. फांद्या पिसाटल्यासारख्या स्वतःभोवती फिरताहेत. गवताची थरथर आणि जिकडे मिळेल तिकडे पाणीच पाणी धाव घेतेय.


स्थिती : उत्पत्ती आणि लय यामधील अवस्थेत आपल्याला खेळविणारी ती महानदी. जन्माच्या वेदना आणि विलय होण्याचे सत्य विसरावयास लावून वर्तमानात जगायला शिकविणारी जीवनदात्री. ऐश्वर्य, ज्ञान, सुख आणि शांती यांचे मूलस्वरूप.


अगदी कोरड्याठाक पाषाणास रंगीबेरंगी वस्त्रभूषणे चढविणारी ती जगाला मंत्रमुग्ध करत जीवनाच्या अस्तित्वाला अर्थ प्रदान करणारी. जिच्या किनाऱ्यावर गावे, शहरे वसली आणि संस्कृतीची सुरवात झाली, पशु पक्षांची आश्रयदात्री अशी ती सिंधू.संपूर्ण देशभर बारीक कोरीव काम करीत एक सभ्यतेचे सुंदर वस्त्र तिच्या दोन्ही काठांवर विणले गेले. कोणी तिला सप्त सिंधू , सप्त गंगा , गोदावरी, कावेरी , नर्मदेची उपमा दिली. पण एक मात्र खरे कि अजाणतेपणाने तिची हि मुक्त हस्ताने वाटण्याची प्रवृत्ती आपण आपलीच शक्ती समजून चुकलो. कधी ती सौम्य असते तेव्हा आपण तिच्या लाडक्या बाळासारखे वाढतो, तर कधी तिच्या अवखळ प्रवाहात प्रियकर होऊन चिंब भिजतो, लहान मुलांची ती डोह रूपात सवंगडी बनते तर कोपल्यावर ती आपल्याला तिच्या आत ओढून संपविते देखील. परंतु शेवटाजवळ मात्र ती असते सर्व अस्तित्वाचा पसारा घेऊन आपल्या मूळ स्वरूपात कायमची विलीन होणारी एक योगिनी.
पावसाच्या वर्षावातून आलेले आणि भूगर्भातुन पाझरलेले थेंब या सुंदर पुष्कर्णी प्रवेश करतात. प्रत्येक भिंतीवरील कोरलेल्या देवता जणू या अस्तित्वाच्या सुरवातीस आणि शेवटास साक्षी असणाऱ्या या उर्जेची उपासना करणारी ही भूमी.प्रकृति आणि माया: सृष्टि स्वतःच मोहिनीसारख्या मोहक आणि कालीसारख्या भितीदायक रूपात नर्तन करते. ती प्रत्येक सजीव आणि निर्जीवांच्या आत आणि बाहेर देखील आहे. त्या पावसाच्या थेंबामध्ये आणि त्या थेंबाला स्वतःत साठवून ठेवणाऱ्या दगडात, गवताच्या डोलणाऱ्या पात्यात आणि त्याला हलविणाऱ्या वाऱ्यात देखील आहे. ढगांमधील बाष्पात आणि सागराला मिळायला निघालेल्या महाकाय धबधब्यात देखील तीच आहे . आपल्या आसपास चालणाऱ्या या प्रचंड नाट्यपटावर नवनिर्मिती आणि जुन्याचा नाश सुरूच आहे.तिच्या रूपावर मोहित होऊन कोणी कवने केली, शिल्पे निर्मिली, चित्रे चितारली तर कोणी संशोधन केले, नगरे उभारली, तर काहीं स्वत्वाच्या शोधात सन्यस्त झाले.अन्नाच्या प्रत्येक घासात, फळांच्या गोडव्यात, कलेच्या नवनिर्मितीत, सोहम आणि कोहम च्या प्रत्येक प्रश्नोत्तरात तुम्हाला तिचेच प्रतिबिंब दिसेल. प्रत्येक ऋतू तिचेच गायन गातो, कवी आणि पक्षांच्या कंठात तिचाच ओलावा असतो.


प्रत्येक बिंदूत एक सिंधू आणि प्रत्येक सिंधूत एक सिंधू सागर असतो .