top of page
  • Writer's pictureYogesh Kardile

राम कथा 





मानव असण्याचा एक अनोखा अनुभव म्हणजे पिढी दर पिढी एकाकडून दुसऱ्याकडे दिली जाणारी संपत्ती म्हणजेच कथा. कधी ती आपल्या पूर्वजांची, गावाची, ग्राम दैवताची किवां देशाची असते . या अशाच कथा आपल्याला घडवितात. कोवळ्या मनावर संस्करण करीत एक छाप सोडून जातात जी आपण आयुष्यभर सोबत ठेवीत पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य करतो. राम-कथा ही एक अशीच कथा जी फक्त भरतखंडच नाही तर जवळपास अर्ध्या जगात वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे. प्रत्येकाची राम कथा तितकीच अनोखी आहे. 




असा हा राम कोणासाठी राजा, प्रभू, पती, सखा, शत्रू, मुलगा होता.  आणि प्रत्येकाने त्याला वेगवेगळ्या रूपात आपापल्या कुवतीप्रमाणे अनुभवले, स्मरले आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचविले. वाल्मिक ऋषी ज्यांच्या अंतःकरणातून स्फुरलेली ही राम कथा या देशाचा नायक कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणून अनेक पिढ्यांपर्यंत हजारो वर्षे आपल्या सर्वांमध्ये वाहत राहिली. या देशातील त्यागी योद्धे, संन्यासी, राजे, साधू-संत या सर्वांनी आपापल्या परीने राम आपल्या आयुष्यात अंगी बाणविला. तर कोणी अंगाखांद्यांवर गोंदविला. 




कोणी म्हणेल राम खरेच होता का ? की  फक्त कथाच ? मी म्हणेल शत कोटी व्यक्तींच्या मुखातून ज्याचा जप आयुष्यभर पिढ्यानपिढ्या या देशी वनातून ते महानगरापर्यंत झाला तो मात्र निश्चितच खरा होता. राम कथेत जो भारत देश आला तो खरा होता. राम कथेत जे बंधू, पती पत्नी, मित्र यांचे एकमेकांप्रती  होते ते खरे होते. या देशाच्या आत्म्याला आकार देऊन जगभरात विश्वगुरू बनविण्याची ताकद या कथेने जी आपल्याला दिली ती खरी होती. प्रत्येकाच्या आतला राम तितकाच खरा होता जितका वाल्मीकींच्या शब्दांमधला. मानवी शरीरे ही प्राणाबरोबरच विचारांचीही वाहक असतात. जशी जमीन हि संपत्ती तसेच विचार देखील संपत्तीच असतात. आणि ती आपण आपल्या पूर्वजांकडून पुढच्या पिढीकरिता एक वाहक म्हणून सोबत घेऊन जगत असतो.   






 संपन्न देश निर्मितीकरिता आदर्श पुरुष आणि स्त्रियांच्या कथांची गरज तेवढीच असते जेवढी कसदार जमीन आणि पाण्याची. रामकथा ही हजारो वर्षांपासूनची संपन्न भूमी आहे जिच्या आधारावर या देशाचा नायक घडत आलाय. चिखलामध्ये पाय असलेल्या समाजाला आकाशाकडे डोळे भिडविण्यासाठी धीर देणारी राम कथेने अनेकांना प्रेरणा दिली. शिवरायांना प्रतिकूल परिस्थिती स्वराज्य स्थापनेसाठी जिजाऊनीं रामकथाच सांगितली. कबीरांनी रामाचे विविधांगी स्वरूप आपल्या दोह्यांमधून दर्शविले. जगदगुरु तुकारामांनी समर्पक शब्दांमध्ये आपल्या आतला राम सांगितला तर संत तुलसीदास व रामदास स्वामी यांनी रामनामी आयुष्य अर्पिले. अशा या कथेमध्ये देशाला संपन्न, सुरक्षित, नीतिमान आणि बलशाली बनविण्याची ताकद आहे. 



आज शेकडो वर्षांच्या संघर्षाला फलस्वरूप येऊन आपल्याच देशात आपल्याच नायकाचे मंदिर उभे राहत आहे. येथून पुढे राम कथेतील रामाला मूर्त स्वरूपात दर्शन करण्यासाठी आपण त्याच्याच नगरीत जाऊ शकतो यासारखे दुसरे सुख ते काय !



हो माझ्या देशाची चिंता करणाऱ्या मित्रांनो आपल्या देशात गरिबी, वीज, पाणी, दवाखाना, रस्ते या समस्या पुढेही राहतील परंतु त्या सोडविण्यासाठी समाज आणि राजकीय इच्छाशक्ती हे देखील कार्यरत राहणारच. भौतिक सुख आणि सुधारणा हा प्रवास चिरंतन असतोच. त्यामुळे त्याची चिंता करताना समाजाच्या अध्यात्मिक आणि मानसिक आधारासाठीच्या शक्तिस्थळाची काळजी देखील आपण घ्यावयाची असते. आजच्या या मंगलमय प्रसंगी रामनाम स्मरण करून आपण सर्वजण एक देश म्हणून एकत्र येवूयात. जय सियाराम ! 




जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा उपदेश आजच्या मंगलमयी दिवशी अंगी भिनवूया.


राम राम राम सकळहि म्हणती।

कोणी ना जाणती आत्माराम॥

राम तो कालचा सुत दशरथाचा।

अनंत युगाचा आत्माराम॥




All rights reserved.

A.I. art created by Yogesh Kardile ( in Midjourney )

32 views0 comments
bottom of page