top of page

सेल्फ लव्ह आणि सेल्फ केअर : संवाद तरुण छायाचित्रकार आणि कलाकारांशी

  • Writer: Yogesh Kardile
    Yogesh Kardile
  • 1 day ago
  • 13 min read

प्रिय मित्र आणि मैत्रीण, माझ्यासारखा तू आयुष्याच्या एका टप्प्यावर खूप विचार करून इतर सगळे मार्ग सोडून कलेची उपासना आणि त्याद्वारे आयुष्य चालविण्याचा निर्णय घेतला असेल . मग ते छाया/चित्रण/ शिल्प/ लेखन इत्यादी काहीही असेल तर हा संवाद तुझ्यासाठी. जर लहानपणापासून आसपासच्या गोष्टींनी तुझ्यात संवेदना किंवा सहवेदना उत्पन्न होत असेल तर लेख तुझ्यासाठी. तू आत्ता कदाचित तरुण असशील किंवा चाळीशीत कुठेतरी थांबून तुला मागे पाहावेसे वाटेल आणि भविष्य धूसर दिसेल तेव्हा हा संवाद तुला झाले तर आधार देईल. थोडी माझी कथा थोडी तुझी थोड्याफार फरकाने सारखी असेल किवां नसेलही पण कुठेतरी तुला सांगताना मीच मला सांगतोय.


शाळेपासून ते कॉलेजपर्यंत तुझ्यातील कलेला कदाचित वाव मिळालेला असेल. एखाद दुसरे अवॉर्ड, स्कॉलरशिप, गॅदरिंग मध्ये रुबाब आणि कॉलेज नंतर मात्र इतर सगळे खरोखरीचे काहीतरी काम करायला सज्ज तर तू मात्र पुढे काय असा विचार करणारा … तुझी लढाई तेथून सुरु होणार ते शेवटपर्यंत चालूच. त्यांची देखील चालूच असेल परंतु जगाच्या दृष्टीने त्यांचे काम उपयुक्त आणि तुझे मनोरंजन. पण अर्थातच हार्मोन्सचे प्रचंड बळ उत्साहाच्या आणि पॉझिटिव्हिटीच्या रूपात तारुण्यात असणारच त्यामुळे तू तिकडे दुर्लक्ष करशील यात शंका नाही. आई वडिलांची साथ आणि विशेषतः पैसे असतील तर प्रवास थोडा सुखकर होईल. परंतु या मार्गावर एक कलाकार म्हणून स्वतःला तुला वारंवार कात टाकावी लागेल.


कलाकार आणि कलेची आवश्यकता :


सकाळी उठल्या उठल्या Spotify वर लावलेली गाणी किंवा भजने ते रात्री झोपतानाच्या गजल / इंस्ट्रूमेंटल संगीत याच्या अधे मध्ये जगभर प्रत्येक मानव आपल्या आयुष्यात कलेचाच आधार जगणे सुखकर करण्यास घेतो. विश्वास नसेल तर फेसबुक ची कल्पना लिखाण, फोटो आणि व्हिडिओंशिवाय करून पहा, इंस्टाग्राम वर फक्त रिकाम्या ग्रीडसची कल्पना कर, रस्त्यावरचे कोरे होर्डिंग्सची कल्पना कर. संगीत महोत्सव, नृत्य अकादमी तुझ्या शहरात नाहीयेत. संग्रहालये गायब झालीयेत, मंदिर आणि महालाच्या भिंती आणि खांब साफ आणि पुसले आहेत सर्व शिल्प व चित्र तेथे नाहीयेत. पुस्तकांमध्ये फोटो, लेख, कविता नाहीयेत फक्त हिशेब आहे. शक्य आहे का ? नाही ना ? रसिक आणि रानटी यांच्यातली रेषा ही कला असते. त्याकरिता तुला जंगलात जाण्याची गरज नाही. तुझ्या आसपासच तुला दोन्ही प्रकारची माणसे सापडतील.

भय, निद्रा, आहार, मैथुन, वस्त्र आणि निवारा यापलीकडे प्राणी आणि आपल्यात जो फरक आहे तो सहवेदना, कल्पनाशक्ती, हास्य आणि एकमेका सहाय्य करण्याची वृत्ती. त्यामुळे मानवी संस्कृती म्हणून जे काही आहे ते ते सर्व तुझ्या मागे उभे आहे आणि त्यात नवीन भर तू घालणार आहे. फरक इतकाच कि ते कोणी मान्य करून तुला सहयोग करेल किंवा नाही. आणि म्हणून माझे चिंतन आणि अनुभव तुझ्यासाठी.


स्थळ काळापलीकडील अस्तित्व :

तू ज्या घरात, जातीत, धर्मात, लिंग ( स्त्री, पुरुष, LGBTQ++ ), शहरी किंवा गावी जन्मला तरीही एक व्यक्ती म्हणून तू सत्व, रजस, तमस या त्रिगुणांच्या सोबत नवरस आणि वैश्विक अस्तित्वाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणारा आणि त्याला मूर्त स्वरूपात आणणारा दुवा आहेस.


तुझी कला ही कुठल्याही बंधनात नसावी कारण बंधने हि समाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी वरिष्ठांनी जरी केलेली असली तरी सर्वोत्कृष्ट अनुभूती हि प्रेम आणि स्वातंत्र्याच्या द्वारेच येते. ‘चित्त जिथे भीतिशून्य उन्नत तिथे माथा “ हे रवींद्रनाथांनी उगाचच म्हंटले नाही. स्थळ काळाची बंधने तुझ्यावर तशीही राहतीलच परंतु किमान आपल्या मनाला तरीही कुठलीही बंधने घालू नकोस.


भूतकाळात जे झाले तेच सर्वश्रेष्ठ, वर्तमानात सर्व अधःपतन झालेले, तर भविष्य म्हणजे अंधकार अशा प्रचाराला बळी पडू नकोस. जो अनुभव पृथ्वीवरच्या पहिल्या मानवाला निसर्गाच्या लीला पाहून झाला होता तोच तुलादेखील मिळेल. कारण तुझ्या धमन्यांमधून तीच पंचतत्वे प्रवाहित आहेत. तेच पाणी आजही सागरात आहे, तोच वार अजूनही मुक्तपणे सगळीकडे संचार करतोय. बीजे आजही मातीत गाडून घेऊन पुन्हा वृक्षाच्या रूपाने वर येताहेत तर त्यांचे प्रेम फुलांच्या रूपात फुलतेय. निसर्गात प्रत्येक क्षणी युद्ध आणि उत्सव चालू आहे. कलेच्या रूपाने तू त्यात भिजून जाऊन थोडा आनंद आपल्या कुंचल्याद्वारे थकल्या भागल्या समाजाला देण्याचे काम करतोय. जे अनुभवले ते पुढे नेतोय.

त्यामुळेच या जगात आयुष्याच्या प्रवासात कोणीही स्वयंभू किंवा सेल्फ मेड असा कोणी नसतो. आई वडिलांपासून ते समाज आणि मार्गदर्शक मग ते भले बुरे कसेही असो आपल्याला आकार देतात. माती जरी तीच असली तरी प्रत्येकाचे मडके त्याच्या स्वतःच्या बाजानुसार तयार होते.


माझ्या जडणघडणीला आकार देणारी काही थोडी नावे येथे नमूद करतो. अर्थातच ४६ वर्षांचा हा प्रवास अनेक वटवृक्षांच्या छायेखाली घडला. त्यातील काही लोक म्हणजे Annie Lebovitz , Herb Ritts, Sebastiao Salgado, Tarun Khiwal , Prabuddha Dasgupta, Leonardo Da Vinci, Van Gogh, Michael Angelo, Frida Kahlo, Raja Ravi Verma, Steeve MacCurry, Guljar, Gulam Ali, Alain Laboile, Bulleh Shah, Rumi, Khalil Gibran, Sant Kabir, Tukaram Maharaj, Goraksha Nath, Abanindranath Roy, Ananda Coomarswamy, Adi Shankaracharya, Kalidas, Haal Satavahan, Osho, Shakyamuni Gautam Buddh इत्यादी ही सगळी माणसे मला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटली. यांचे विचार, कला, संगीत यांनी मला घडविले.वरील लोकांपैकी कोणाचे काम मन शांत करते तर कोणाचे काम अंगावर येते. परंतु महत्वाचे हे आहे कि त्यांचे कार्य नवरसांच्या माध्यमातून आपल्या हृदयातून मेंदूत शिरकाव करते. तू देखील अश्याच ताऱ्यांच्या खाली तुझ्या नौकेला दिशा देशील. तुझा मार्ग भलेही निराळा असेल, अभिव्यक्ती देखील अनोखी असेल परंतु हृदयापर्यंत पोहोचणारी त्याची कंपने, ते नवरसाचे गणित मात्र तेच असेल.


तू आणि तुझे वर्तुळ

जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत आपण अनेकांच्या संपर्कात येतो. अनेकांमुळे आपण प्रभावित होतो तर अनेकजण आपल्यामुळे. काही रक्त, नाते, कर्म ( व्यावहारिक कामे ), मैत्री यानिमित्ताने आयुष्यात येतात आणि त्यानिमित्ताने आपल्यावर हक्क दर्शवितात.


कुटुंब : तू कुठे जन्माला यावर तुझंही नियंत्रण नाही ना तुला जन्म देणाऱ्यांचे. जन्म हा एक अपघात असून फार फार तर तू याला कर्म / प्रारब्ध म्हणून शकतो. तुझ्या जन्माचा निर्णय घेणाऱ्या जन्मदात्यांचे तुझी जबादारी घेणे हे जसे कर्तव्य तसेच तुही त्यांच्याप्रती कर्तव्याला बांधील असतो. परंतु जी ऊर्जा ते तुझ्यासाठी खर्च करतात तेवढीच तू देखील करावी ही साधारण अपेक्षा या नात्याला एका व्यवहाराच्या रूपाने बांधते. पण या व्यवहारापलीकडे तू मात्र वेगळा असू शकतो तेथे तुझासमाज, आडनाव, जात, गाव ही उणीपुरी ५००० वर्षांची तयार झालेली व्यवस्था समजू शकणार नाही. आफ्रिकेतून बाहेर पडलेला मानव जगभर पसरला तू त्याचाच वंशज आहे. मग तुझ्या सीमा देखील तूच ठरवायच्या. त्या भौगोलिक, सामाजिक, वैचारिक, आर्थिक कुठल्याही असो. कारण तुझे काम वैश्विक होणे हीच तुझी नियती. तुझे वडील तुझ्या आजोबांसारखे वागले नाहीत ना तुझी आई तिच्या आईसारखी. आणि तसे जरी असेल तर तू नवीन घडी बसविण्यासाठी जन्माला हे स्वतःला सांग. त्यामुळे त्यांची फुटपट्टी ही तुझ्यासाठी नाही हे समजले कि तू मोकळा.


तुझ्या घरात जर कोणी कलाकार नसेल तर तुझ्या कलेचे मूल्यमापन करणारी व्यक्ती तुला बाहेरच शोधावी लागेल. जर घरात बंगला, गाडी, पैसे, परदेश प्रवास, मोठे मोठे कार्यक्रम यावर चर्चा होत असेल आणि तितक्याच उत्साहाने तुझ्या छोट्याश्या कवितेवर, चित्रावर किंवा नृत्यावर चर्चा होत असेल तर तू नशीबवान. जेवढी चर्चा तुझ्या पगाराची, गाडीची तेवढीच चर्चा तुझ्या छायाचित्राची, फिल्मची घरात होते का यावरून त्यांची कलासाक्षरता ठरेल. आणि जर तसे नसेल तर त्यांचे तुझ्या आयुष्यातील जे काही मोजकेच योगदान आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा व तुझी ऊर्जा त्या प्रेमाच्या नात्यासाठी ठेव जे तुझ्या शब्दांसाठी, मैफिलीसाठी, कामासाठी उत्सुक असेल. रक्त हे सर्व मानवांमध्ये असते. प्रेम मात्र रक्तापेक्षा समान धाग्यांमध्येच गुंफले जाते. “तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे काम नाही”


पहिल्या पावसाची सर आणि वसंताच्या उन्हात उमललेली रानफुले तुझ्या मनाला जितकी उल्हसित करतील तितकेच ट्रेडिंग, सोन्याचे उतार चढाव त्याला उत्साही करीत असतील. त्याने तिकडे आनंदित व्हावे तू येथेच रमावे. तुझ्या आनंदावर कोणी विरजण घालण्याआधीच मात्र तू स्वतःचा कोपरा शोधून त्यात रममाण व्हावे. छोटी का होईना पण एक स्वतःची जागा असावी जेथे तू तुझ्यातल्या कलाकाराचे लाड करावे.


माझ्या सुदैवाने वडील त्यांचा स्वतःचा वेगळा मार्ग असून, आमच्यात कधी समान विचार तर कधी मतभिन्नता झाली तरीही संवाद मात्र त्यांच्या शेवटी शेवटी दवाखान्याच्या बेडपर्यंत टिकून होता. दादासाहेब काहीतरी नवीन सांगा ! असे सकारात्मक वाक्य व सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे हि त्यांची आवडती कविता मला फोनवर सांगायचे. माझ्या यश आणि अपयशात सोबत राहणारी जन्मल्यापासूनची एकमेव व्यक्ती. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद साजरा करून माझ्या दुःखात मात्र या कानाचे त्या कानाला न सांगता गुपचूप मदत करणारे.


असो. रक्ताच्या नात्यात विचारांचे नाते तयार होणे हे मोठे नशीब. परंतु सगळ्यांकडून ही अपेक्षा ठेवणे तितकेसे योग्य नाही आणि त्याच न्यायाने इतरांनी देखील तुझ्याकडून तशीच अपेक्षा ठेवणे देखील चुकीचे. तुझा मार्ग हा तुझाच आहे त्यावर तूच चालायचे आहे. घसरत, अडखळत, उड्या मारीत, ऊन पाऊस, थंडी, वारा सर्व काही झेलीत तुझ्यातल्या रसरशीत व्यक्तिमत्वाला सर्वांगाने घडवायचे. हो तुझ्या ऊन पावसातील छत्री धरणारा हात कधीही विसरू नकोस आणि त्याचवेळी तुझ्यापासून दूर गेलेले लोकही. हे दोन्हीही लोक तुझी शिक्षकच आहेत.


ना-ते वाईक, बालपणीचे मित्र, तुझे गाव किंवा शहर :


रक्ताच्या नात्याने तुझ्याशी जोडलेली लोक तुझी तुलना तुझ्या भूतकाळासोबत करतील. तू लहानपणी असा होता परंतु आत्ता मात्र तसा राहिला नाहीस. जरा माणसात येत जा. व्यवहारात जगायला शिक. त्यांच्या मतांचा सन्मान कर. नाही पटले तर त्यांच्यातून स्वतःला बाजूला कर. परंतु तुमच्या बालपणाच्या भूतकाळावर आधारित तुलना, तुम्हाला स्टॉकिंग करणे परंतु कुठेही व्यक्त न होणे. भेटल्यावर सांगणे अरे आम्ही तुझे काम पहिले पण समाजमाध्यमातून कधीच अवाक्षरही न काढणे. चार लोकांना तुला काम देण्यास न सांगणे परंतु तुझ्याकडून फुकट कला कृती ( फोटो, चित्र, शिल्प, कार्यक्रम करणे, माहिती घेणे ) याची अपेक्षा ठेवणारे हे लोक तुझे नाहीत. अशा लोकांपासून पहिल्यांदा लांब राहा. अश्या अनुभवातून मी आणि माझ्यासारखे अनेकजण वेळोवेळी समृद्ध झालोय. त्यामुळे जेव्हा एखादा सिनिअर कलाकार फटकळपणे का बोलतो ते मला आत्ता कळते.

तासंतास विचार करणे, दूर फिरायला जाणे, वर्षानुवर्षे पुस्तके वाचणे, इंटरनेटवर संशोधन करून नवीन गोष्ट शिकणे, लेक्चर्स ऐकणे, नवीन टूल्स विकत घेण्यासाठी / त्या एका ट्रेकसाठी कपड्यांचे पैसे कॅमेरा रोल्सला वापरणे या सर्वातून गेल्यावर त्याची ही व्यवहारात खूप काही किंमत असते हे स्वतःला पहिले सांग. फक्त एक फोटो, एक पोर्ट्रेट, नवीन ठिकाणची माहिती अशीच मिळत नसते त्याला सर्व्हिस प्रोव्हायडींग किंवा कन्सल्टिंग म्हणतात. नवीन लोकांना जोडणे याला नेटवर्किंगम्हणतात आणि हे असेच फुकट देणे पहिले थांबव. ना तुझे पुस्तक कोणाला फुकट दे, ना तुझा फोटो, ना संपर्क. किंमत असणाऱ्यांसाठी मात्र तुझा खजिना सताड उघड ठेव परंतु ते समजण्यास बराच काळ जाईल.


माझे वडील ज्यांनी विविध विषयांवर १८ पुस्तके लिहिली ते मला सांगायचे . जवळपास ४० वर्षे भारतीय अध्यात्म, धर्म या विषयावर सांगोपांग चिंतन, प्रवचने, व्याखाने, भारतभर अनेकवेळा प्रवास करून त्यांनी ही पुस्तके लिहिली. कादंबरी, काव्य, संशोधन, आत्मचरित्र, टीका अश्या सगळ्या साहित्याच्या क्षेत्रात विहार केला. बाहेरच्या ठिकाणी त्यांना श्रोता वर्ग मिळाला. सत्कार झाले, पुरस्कार मिळाले, मिरवणूक निघाली मात्र ज्यांना जवळचे समजले तेथे उन्हाळाच अनुभवायला आला. या हृदयीचे त्या हृदयी तार छेडणारे लोक त्यांच्या भाषेत “प्रेमाची माणसे” यांची आडनावे वेगळीच होती. ना कुठे जात ना धर्म तेथे आडवा आला. कोणी बशीर, साळवे, गायकवाड, राजळे, सांगळे, सहस्त्रबुद्धे तर बागवान अशी जीवांचे मैत्र त्यांनी जोडले. सुदैवाने यातील अनेक लोक माझ्याही आयुष्यात मार्गदर्शक म्हणून आली. त्यामुळे जे जपले जाते ते नाते बाकीचे ना — ते.

लक्षात ठेव एका जागी राहायला तू झाड नाहीस. तू एक प्रवासी आहेस जो सतत आनंदाच्या शोधात फिरत असतो. कलाकार हा नातेसंबंध जरी पालन करीत असला तरीही तो सगळ्यातून वेगळा असतो. जो समाज तुला स्वीकारेल, तुझ्या कलेचा उत्सव करेल तीच तुझी कर्मभूमी निवड. जशी हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगर वसविले, रोम्युलसने रोम. तू तुझ्या मनातले शहर एका कोपऱ्यात बनव, कॅनव्हासवर, फिल्ममध्ये किंवा मूर्तीत साकार कर.


ज्या समाजाने आपले बाहू कलाकारांकरीता विस्तारले त्त्या गावी, शहरी, देशी कालजयी कलाकार आणि कलानिर्मिती झाली. आज भरपूर पैसे खर्च करून पॅरिस, फ्लोरेन्सला जाऊन तेथील संग्रहालये ( मोनालिसाचे पेंटिंग ), पुतळे पाहून पोसेझ देताना त्या लोकांना त्या दूरदेशीच्या रेनेसॉ ( Renaissance )चळवळीची ना नीट माहिती असते, ना आपल्या जवळचा गावातला, नात्यातला कलाकार त्यांना दिसतो. त्याचा यांना फक्त वेळेपुरता वापर करावयाचा असतो. श्रीमंतीची उधळण करनारी बडी धेंडे, आणि त्यांच्यापुढे लांगुलचालन करणारे तथाकथित लोक रोज उत्सव करतात तर याउलट मनस्वी कलाकृती करणारे कलाकार मात्र विपन्नावस्थेत असतात. कारण आपण योग्य जागा आणि योग्य समाज निवडत नाही. तुझा समाज तुझे नातेवाईक जे तुझ्या यशात आणि अपयशात सोबत असतात ते. आपल्यात हे चालत नाही, आपली परंपरा आणि खानदान असे आहे हे म्हणत भ्रष्ट नातेवाईकांच्या पुढे लोळण घेणारे तुझी माणसे नाहीत. गरिबीचे कौतुक करण्याऐवजी कलेची कदर असणारे लोक शोध. मग त्याकरिता कुठेही जावे लागले तरीही जा. तुझ्यातला कलाकार जगला कि तू यशस्वी झालास.


मित्र : मित्रत्वची भूक आहे म्हणून कोणालाही आयुष्यात जागा देऊ नकोस. ओळखीचे अनेक होतील, क्लायंट अनेक मिळतील. एकवेळ तुझा क्लायंट मित्र बनेल परंतु मित्र ( म्हणविणारे ) क्लायंट होतीलच असे नाही. कलाप्रवासात सर्वात जास्त धोका “मित्र “ समजणाऱ्यांकडून होतो. बाकी लोकांपासून तसाही तू सावधच राहशील. परंतु मैत्रीमध्ये तुझी जागरूकता जरा कमी झालेली असेल. मित्र हा शब्द खूपच कमी लोकांसाठी राखीव ठेव. चाहते हजार मिळतील, मदत करणारे देखील मिळतील, पैसे, वेळ आणि संपर्क देणारे देखील मिळतील. परंतु मन मोकळे करण्याची चूक तिथे मात्र करू नकोस. वर्षानुवर्षांचा विश्वास एका क्षणी तोडणारे या जगी खूप आहेत. सोशल मीडियावर तुझे चाहते असतात. तुझा तो एक मित्र कदाचित तुझ्या उत्सवात कुठेच नसेल परंतु मन मोकळे करण्यास मात्र पहिला फोन तू त्यालाच लावशील.


तुझ्या आतल्या अग्नीला फुंकर घालणारे आणि वेळप्रसंगी शांत करणारा मित्र शोधायला जाऊ नकोस तो तसाही मिळेलच. मैत्री आणि प्रेम हे फक्त आणि फक्त समान विचारांचे लोक एकत्र आल्यावर आपोआपच आकृष्ट होतात. त्यासाठी प्रयत्न करू नकोस. हो पण ती झाल्यावर झाल्यावर पुस्तकाच्या मध्ये नाजूक पिंपळपानासारखी ती मैत्री सांभाळायला विसरू नको.

पहिले प्रेम, शाळेतील मित्र हे आयुष्यभर तुझ्यासोबत कायम राहतीलच याची खात्री नाही. कारण मॅच्युरिटी ही सगळ्याच नात्यांचा भाग नसते. कधीकधी काळानुसार नातेदेखील विरून जाणे गरजेचे आणि हितकारक असते. स्वतःवर उगाचच नात्यांची बंधने लादु नको. जिच्या सोबत तू सर्वकाही शेअर करतो अश्या व्यक्तीसोबत जेव्हा लोक घटस्फोट घेतात तसाच तो इतर कुठल्याही नात्यांमध्ये पण वेळ आली की घ्यावा. सगळ्याच नात्यांना कोर्टाची गरज नसते. आणि लोक काय म्हणतील हा त्यांचा प्रश्न.


नाते मग ते मैत्री, नातेवाईक, पालक किंवा भावंडे येथे सुख आणि दुःख इतपत मर्यादित नसते. ते समविचारांवर, एकमेकांच्या सन्मानावर आधारित असते. रामकृष्णांच्या सोबत शारदा माता किंवा विवेकानंदांचे नाव जोडले जाते , तर तुकोबांसोबत जिजाईचे, रुमीसोबत शम्स तब्रिझीचे, फ्रिदा आणि दिएगो यांची नाती अनेक उतार चढावातून गेली. वादळी आयुष्य जगलेल्या अशा माणसांना सोबत करणारी माणसे तितकीच ताकदीची होती. तू मात्र स्वतःवर काम कर. बाकी सगळे आपोआपच जुळून येईल.माझ्या आयुष्यात अनेक मित्र आणि मैत्रिणी आल्या .तुम्ही नसते तर आयुष्य निरस झाले असते. मग ते ट्रेकिंग असो, फोटोग्राफी, लिखाण, व्हिडीओ बनविणे किंवा निव्वळ गप्पा. प्रत्येकाने मला समृद्ध केले. सगळेच काही टिकले नाही परंतु आजही मी त्यांच्या ऋणानुबंधात आहेच. सर्वात जास्त काळचे सख्यत्व आणि मार्गदर्शन मात्र मला माझे वडील आणि माझ्या पत्नी या दोंघांकडून मिळाले.


स्वतःच स्वतःचा उत्तम मित्र हो.जमल्यास Miyamoto Musashi ( The book of five rings ) , Stoicism आणि The Prophet ( Khalil Gibran ) यांची पुस्तके आयुष्यात कधीतरी वाच.

जेव्हा तुझ्यातील युद्ध थांबेल, मन शांत होईल सोबतीची गरज संपेल तेव्हाच खरा मित्र गवसेल. “ दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखाकवी अनंत राऊत यांच्या ओळी जगणारी व्यक्ती तुझ्या आयुष्यात हा निसर्ग आणल्याशिवाय थांबणार नाही.


इंटरनेटवरची भुते ( घोस्टिंग / ट्रोलर्स / स्टॉकर्स ) : ही जमात जी प्रत्यक्षात स्वतःच्या आयुष्यात काहीतरी कमी असल्याने तुझ्याकडे येईल. कधी मैत्रीचा बहाणा करून, कधी तुझा फॅन म्हणून तर कधी तुझे विचार न आवडल्याने खालच्या पातळीवर टीका करणारा ट्रोल म्हणून. एखादी व्यक्ती खूप तारीफ करेल, सुरुवातीला लाईक करेल आणि मग हळू हळू कमी होईल. तुला देखील ते कळणार नाही. पण या दरम्यान तुझे अनेक काँटॅक्ट्स तिच्याकडे गेलेले असतील. हा प्रकार कलाक्षेत्रात खूप होतो फरक इतकाच कि लोक बोलत नाहीत. तर काहीजण सुरुवातीला जवळ आलेले मग हळूच सल्ला देऊन तुझे ध्यान दुसरीकडे वेधतील. तुझ्या ध्येयापासून बाजूला खेचतील. बी पॉझिटिव्ह असे कोणी कितीही पॉडकास्ट मध्ये सांगितले तरीही वस्तुस्थिती मात्र बदलत नाही. त्यामुळे अशी एनर्जी व्हॅम्पायर्स / पॅसिव्ह अग्रेशन असणारी माणसे वेळीच दूर कर.


कॉपी-मास्टर्स : ही प्रजाती कायमच होती आता ( इंस्टाग्राम, फेसबुक आणि पीइंटरेस्ट ) इंटरनेटमुळे जास्त सोपे झालेय. कोणी तारीफ करून जवळ येईल,कोणी मार्गदर्शन या गोंडस नावाखाली फुकट शिकून घेईल व पाठीमागे तुझीच बदनामी करेल. हे सर्व करिअरच्या वेगवेगळ्या काळात घडेल. आमचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या फोटोंच्या चोऱ्या, अगदी मोठे ज्वेलर्स, रिसॉर्ट्स आणि ऍक्टर्स पासून युट्युब चॅनल्स सगळ्यांनी केल्या. तर काही पेंटर्स ने परवानगी शिवाय पेंटिंग्स काढली, अनेक फोटोग्राफर्सने हुबेहूब पोझेस, तर स्टायलिस्टसने साड्या, स्टायलिंग ची नक्कल, दुसऱ्या अकाऊंटवरून स्टॉकिंग हे सर्व काही घडले. योग्य ते मार्ग वापरून बऱ्याच गोष्टी नियंत्रणात आणल्या तरीही या गोष्टी होतातच आणि पुढेही होत राहील. परंतु २० वर्षांपासूनचा एकत्र प्रवास,वाचन, अभ्यास, विचारधारा यांची नक्कल अजूनतरी कोणी करू शकत नाही. तुझेही तेच होईल त्यामुळे विश्वास स्वतःच्या अनुभव, संवेदनशीलता, अभ्यास यावर ठेव. आपले काम दुसऱ्यांमुळे संकुचित मात्र करू नको.


तुलना : ते तुझ्या कामाची तुलना तुझ्या शेजाऱ्याच्या मुलाशी, मित्राशी, भावंडांच्या गाडी बंगल्याशी होईल तेव्हा त्यांचा आणि तुझा प्राधान्यक्रम ओळखून घे. कोणाला शिकविण्यासाठी जाऊ नकोस कारण कलेच्या अस्तित्वानेच संवेदनशील मने हेलावून जातात. तू कोणाच्या दगडासारख्या मनाला मात्र शिकवू शकत नाहीस परंतु जिथे किंमत आहे तिकडे जा.मी २००३ साली गावी स्टुडिओ टाकला असताना एका पोर्ट्रेटची किंमत १०० रुपये होती ती आज काही हजारापर्यंत गेलेली आहे. परदेशी ती अजून जास्त, त्याचेच पेंटिंग झाले तर ती लाखात जाते. प्रत्येकवेळी काम मिळेतेच असे नाही. परंतु तरीही आपली किंमत कुठे आहे तिकडे जा. कदाचित ती लगेचच मिळणार नाही. एखादेवेळी तू या पृथ्वीवरून गेल्यावर मिळेल. पण आज बांधलेले घर १०० वर्षांनी तसेच राहील याची देखील खात्री कोणी देईल काय ? दोन पिढ्या पुढचे लोक देखील तिथे राहत नाहीत. आज घेतलेली गाडी १० वर्षांनी बदलावी लागते. मात्र म्युझियमच्या भिंतीवरील छोटेसे चित्र, एखादी मूर्ती त्याच्या दुर्मिळतेवरून आणि कलात्मकतेवरून तिची किंमत कायम वाढतच जाते. एखाद्या संगीतकाराच्या शेवटच्या परफॉर्मन्सची कॅसेट जाणकारांमुळे अमूल्य होते. हे तू स्वतःला ठणकावून सांग.


कलाकृती म्हणजे वैश्विक अनुभूतीची वैयक्तिक प्रतिक्रिया जी समाजाच्या हृदयाला स्पर्श करून पुन्हा एकदा वैश्विक बनते. तिच्यावर फक्त त्या कलाकार व्यक्तीची छाप असते. आता ती कलाकृती मोठी कि छोटी हे कोण ठरविणार ? पैसे देणारे ? स्तुती करणारे ? कि प्रेक्षक ? समाजाच्या सोयीनुसार कलाकार त्याच्याच जीवनात डोक्यावर घेतला जातो किंवा अनुल्लेखाने मारला तरी जातो. परंतु जेव्हा तू कलाकार होण्याचा निर्णय घेतोस तेव्हा हा विचार केला नव्हतास ना ? मग तू फक्त काम करीत रहा. चार पैसे मागे ठेव जेणेकरून तुझे कुटुंब तुला दोष देणार नाही. तुझ्या कामाची किंमत कदाचित तुझ्यानंतर होईल. आणि नाही झाली तरीही तू कुठे अमर होण्यासाठी जन्म घेतला होतास ?


तुझा वेळ : आपली ऊर्जा कोणासाठी किती खर्च करावयाची हे तू वेळीच ओळख. कलाकार हा एकवेळ पैशाच्या बाबतीत मोकळा ढाकळा असलेला चालतो वेळेच्या बाबतीत मात्र नाही. करोडो रुपये देऊन तो क्षण तो दिवस, ती पोझ, ती घटना पुन्हा पुन्हा आयुष्यात घडत नाही. त्यामुळे तो सूर्योदय किंवा सूर्यास्त, तुझे आवडते गाणे, तुझ्या आवडत्या कट्ट्यावरची कॉफी किंवा चहा मात्र चुकवू नकोस. फोन दिवसभर सायलेंट असला तरीही चालेल जग वाट पाहिलं. पण तू मात्र कार्यमग्न राहा. तुझी किंमत तुझ्या नात्याने नाही तर कामाने आहे हे लक्षात ठेव. तू किराणा माल विकणारा नव्हेस ज्याचा डाळ भात सगळ्यांना हवाय. त्याची गरज वेगळी तुझ्या कलेची वेगळी. जो तो आपापल्या जागी योग्य. त्यामुळे प्रसिद्धी आणि पैसे एकत्रच येतील हे हि सांगता येत नाही. परंतु त्या कलाप्रकाराने तुला निवडले. तुझ्या माध्यमातून एक गोष्ट फुलतेय यात आनंदी हो. सगळीकडे आपली ऊर्जा खर्च करण्याऐवजी एके ठिकाणी केंद्रित कर. दिवस रात्र स्वप्नांत सुरवंटासारखे तिचा कोष विणीत जा एके दिवशी तिचे रूपांतर फुलपाखराच्या जरूर होईल.


एकांत : सगळ्या रोगांचे औषध. ‘जे वो एकै जाँणियाँ तौ जाँण्या सब जाँण, जे वो एक न जाँणियाँ तो सबहीं जाँण अजाँण’ तू कोण आहेस, तुझे गुण आणि दोष नेमके काय आहेत हे तुझे तुला नीट ठाऊक असते. फक्त आपण जाणीवपूर्वक ते मान्य करीत नाही. आपल्या सावलीला देखील ओळख त्यातून तुझा, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांना कलेतून उत्क्रांत कर. कारण त्यांना अमान्य करणे म्हणजे स्वतःतल्या मानवाला नाकारणे. त्यांच्या शिवाय जगात कुठलीही व्यक्ती अस्तित्वात नव्हती आणि होणारही नाही. एकांतात त्या सगळ्यांना बाहेर येऊन खेळून दे. त्यांना नीट निरखून पहा. कारण या विश्वात प्रकाशरुपी हे एक छोटेसे बाळ अंधाराच्या अथांग गर्भात खेळते आणि त्यामुळेच त्याचे सौंदर्य व किंमत आहे. संपूर्ण प्रकाश आणि संपूर्ण अंधार असे काही असल्यावर तेथे अस्तित्व संपून जाते. त्यामुळे आपण प्रत्येकजण या दोन्हींच्या संधीकालावरच जगतो.


पहिले प्रेम हे स्वतःवर कर. त्याकरिता सकाळचा पहिला वेळ आणि रात्री झोपण्याच्या आधीच वेळ फक्त तुझ्याच साठी राखून ठेव. जग तशीही कुठे तुझी वाट पाहतेय ? राम कृष्णही आले गेले। तयां विना हे जग ना अडले।। कुणीं सदोदित सूतक धरिलें। मग काय अटकलें मजशिवाय।। जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जातां राहील कार्य काय।। भा. रा. तांब्यांची शाळेत शिकलेली ही कविता अजूनही मला मार्गदर्शक वाटते.


मृत्यू : या सृष्टीचे सर्वात सुंदर सत्य. ज्या अज्ञात दारातून आपण अस्तित्वात येतो आणि कालांतराने त्याच दारात हा देह सोडून प्रवेश करतो. कोणाचा हा प्रवेश निरव शांत असतो, कोणी मोहाने /दुःखाने तडफडतो. परंतु आपण जगतो कसे ते जास्त महत्वाचे. आपली ऊर्जा माणसात, निसर्गात कशी मुरते ते तू ठरवायचे.


बुद्धाचे ध्यान, शंकराचार्यांचे धीरगंभीर निर्वाण षटक, व्हॅन गॉग ला असलेली सूर्याच्या रंगांची चित्रबद्ध करणारी तीव्र ओढ, Herb Ritts चे कॅलिफोर्नियाच्या सूर्यप्रकाशातील चकाकणारे सुडौल नग्न मानवी आकार, Alan Leboil च्या छायाचित्रातील बालकांचे निष्पाप खेळ, Sebastian ची मानवी सामूहिक दुःखाला भिडण्याचा संयम. अबिन्द्रनाथाच्या चित्रातील नायिकांची लय, कालिदासाच्या कल्पनेतील दूत बनलेला मेघ, गाथा सत्तसईतील विरहिणीच्या कविता तुला खुणावतील. अमूर्ताच्या अनंत शक्तीचा स्पर्श झालेली हि सगळीच अफाट माणसे होती. तू तुझ्या रंगाने, लयीने, समजुतीने तू आयुष्याचा पट जगायचा. तुझा मार्ग तू आखायचा. स्वान्तसुखाय ध्यानी बनत तू शतायुषी हो किंवा ज्वालामुखी सारखा फुटून जगाला आपल्या रंगात रंगणारा रांगडा कलाकार बनत हे मात्र तुझ्याच पिंडावर ठरेल. स्मशानभूमीत कवटी फुटण्याचीदेखील वाट न पाहणारे आयुष्याची रेखा लांब कि छोटी हे मोजत बसणारे तुझ्यासाठी असून देखील नसणारे.


तुझ्या लयीवर मान डोलावणारे, रंगांच्या फाटकाऱ्यात हरवून जाणारे, तुझे नृत्य पाहून त्यावर ताल धरणारे तुझा भूतकाळ पाहणार नाहीत तर तुझ्या ऊर्जेत ते न्हाऊन निघतील. भलेही ती व्यक्ती एकच का असेना. पहिले नृत्य तू स्वतःसाठी कर. कारण मृत्यूच्या आधीही आणि पुढेही ऊर्जेचा प्रवाह वाहतोय हे मात्र नक्की. आत्ता मात्र त्या प्रवाहात आणि तुझ्या मर्यादेत न्हाऊन निघ. कोणाच्या परवानगीची वाट पाहू नको. कारण मरणाच्या दारावर तू अनुभवलेले क्षणच तुझ्या क्षीण हृदयाच्या धडधडीत उरणार आहेत. तुझी ती इंपोर्टेड गाडी दुसऱ्याची होणार, ते ब्रँडेड कपडे वाटून दिले जातील, त्या घरातुन तुझे प्रियजन एक एक करीत निघून जातील आणि दुसरे कोणीतरी येईल ज्याला तुझे नावही माहित नसेल. तुझ्या जवळचे तुझा श्वास थांबला म्हणून आपले नाक दाबून ठेवणार नाहीत हे मात्र नक्की. तुला कोणी लिओ भेटेल मग तू व्हॅन गॉग बनशील याची वाट पाहू नकोस. फ्रिदा सारखे दुःखाचा देखील उत्सव कर. लीओनार्दोसारखा विविध क्षेत्रात विहार कर भलेही काही गोष्टी अर्धवट राहतील पण अर्धवट जगू नकोस. कारण मरण हे संपूर्णपणे परिपूर्ण असते.


लेखन : योगेश अशोकानंद कर्डीले

संपर्क : 9740932248


Comments


Join our mailing list

  • YouTube Social  Icon
  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Flickr Social Icon
  • Instagram Social Icon

© Raginee Yogesh Kardile

Any text / image / video from the site

must not be used without prior permission. 

bottom of page