top of page

स्वतःशी संवाद 

  • Writer: Yogesh Kardile
    Yogesh Kardile
  • Sep 25
  • 3 min read


ree



मनाला कशाने समाधान मिळते ? कशानेच नाही. जितके भोगू तितके अधिक हवे. सततची आग भडकलेली , नाविन्याची आस. कारण ? माहित नाही. समाजाने लादलेली मूल्ये, आई बापांनी लादलेल्या सौख्याच्या संकल्पना आणि आतला राक्षस तो काहीतरी वेगळेच सांगतो. पण का कुणास ठाऊक निसर्गात गेले कि सारे काही विरघळून जाते. अगदी शांत वाटते. हजारो ग्रंथांची पाने वाऱ्यावर लहरणाऱ्या एका गवताच्या पानापुढे फिकी पडतात. खळखळ वाहणारे पाणी, वाऱ्यावर डोलणारी फुले, मध्येच वाहत येणारे धुके सर्वकाही आपल्या चादरीखाली झाकून टाकते. मग मी पण रोजच्या अडचणी विसरून त्या वातावरणात हरवून जातो. कुठला तो स्वर्ग, कुठेले ते नरक आणि कुठली ती मुक्ती. 


ree

सारे काही आज आत्ता आणि या क्षणात जगताना सर्वकाही आनंदमय बनून जाते. मांडी घालून ध्यान करताना सुद्धा मन भटकते त्यापेक्षा या क्षणात सर्व आयुष्य थांबून जाते आणि उरतो तो फक्त आनंद. प्रत्येक श्वास आणि उच्छवास आनंदमय बनतो. समाज चालवण्यासाठी धर्म, नीती नियम नक्कीच गरजेचे आहे. परंतु त्याचेच ओझ कायम वाहत दोरखंडाने करकचून बांधल्यावर काय वळ उमटतील तसे पिढ्यांपिढ्यांवर संस्कार होतात. आणि माने कायमचीच गुलाम बनतात. धर्माचे, संप्रदायाचे नाव फक्त नवीन असते. 

ree



५००० वर्षांपूर्वी पुस्तके नव्हती, फार तर १० हजार वर्षांपूर्वीचा पुरुषप्रधान राजे आणि त्यांच्या राज्यांचा रक्तरंजित इतिहास. त्यापलीकडे मातृसत्ताक आणि रानोमाळ भटकून गुहेतून शिकार करणारी आपली संस्कृती.  फार फार तर १००००० वर्षांपासूनचे आपण. मग आपण निर्माण केलेल्या गोष्टींची काय ती मिरास ? किती हा गर्व ? सगळेच धर्म मानवनिर्मित. पण मानवी मनाला लागलेली तहान ती कायमचीच. अतृप्तता कायम ठेवून कुठल्यातरी धुक्यात स्वर्गाचे राज्य कल्पून जीवनाचा नरक बनविणारे आपण. 

ree



 निसर्गातील प्रत्येक क्षण मात्र हा रसरशीत आणि  जिवंत. आत्यंतिक आनंद, शांतता आणि कधी कधी जगण्या मरण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवणारा. मनाला पूर्णपणे स्वतंत्र करणारा. नको तो मोक्ष आणि नको तो वाद. निसर्गात फक्त आणि फक्त स्वतःशीच संवाद. एक एक गोष्ट पूर्णपणे तीव्रतेने जाणवते. तो वाऱ्यासोबत येणार गारवा. पाण्याचा ओलावा, रंगीबेरंगी फुले. प्रत्येक गोष्ट निसर्ग नियमानुसार उत्पत्ती, स्थिती आणि लय या चक्रात फिरणारी. आपले तत्वज्ञान हे किती थोटके ? 



ree

त्यातल्या त्यात उपनिषदे मनाला शांत करतात. बुद्धाचा अत्त दीपो भव उपदेश कुठलाही आव न आणता निसर्गासोबत एकरूप करतो. आज अंगावर येणारा पाऊस लाखो वर्षांपूर्वी तसाच होता. त्याचा तो गारवा अगदी तसाच असणार. समुद्रातले तेच पाणी फिरून पुन्हा पृथ्वीवर वर्षाव करीत पुन्हा समुद्राकडे झेपावणारे. जे काही मुळांनी गोळा केले त्यातून गवत, फुले, झाडी उमलली, वाढली आणि पुन्हा त्याच धरणीमध्ये विसावली. 




ree

निसर्गाइतके सत्य दुसरे कुठचे ! काहीही न बोलता तो प्रत्येक क्षणाला सत्य दाखवितो आणि आम्ही तीच झाडी तोडून पाने करून शाईच्या बाटल्या संपवीत मी म्हणतो तेच खरे हा धोशा चालवितो. आपले आणि दुसरे असा भेदभाव करीत आयुष्य संपवून टाकतो. 



ree

समाजाने काळजीपूर्वक निर्माण केलेल्या जाळ्यात प्रत्येकजण पुढच्या पिढीलाही गुलाम करण्याचे शिक्षण देतो. पिढी दार पिढी मग हि गुलामी चालतच जाते आणि आपणहि या पशु पक्षांसारखे स्वछंदी जगू शकतो हे विसरून हेच आपले जीवन समजून आतून बाहेर पडणाऱ्या आदिम प्रेरणेला पाप समजून प्रेशर कुकरसारखे त्या वाफेला जमेल तितके दाबतो.


ree

भय, निद्रा, आहार आणि मैथुन जे सर्वांनाच गरजेचे तेच आपल्यालाही. परंतु त्यापलीकडे मिळालेली कल्पनाशक्ती आणि हास्य आनंदासाठी वापरायचे सोडून दुःखाच्या कहाण्या जगभर रंगल्या. कोणी एकटे तर कोणी समूहात मिळून मानसिक विकारात ग्रासून गेलेलो. परंतु आपल्या समोर घडत असलेले नाट्य अनुभवायचे राहून जाते यासारखे दुःख ते कोणते ? 




ree

वाघ, साप, जळवा यांची भीती क्षणाक्षणाला असते तरीही मी वनांमध्ये रमतो. अंधार पडण्याअगोदर चार भिंतीत परतायचे तरीही शेवटचे रंग डोळ्यात साठवून घेतो. तू देखील  तसाच आहेस फक्त विचार करतोय घरातून बाहेर कधी पडायचे.



ree

भिंतींची मर्यादा ओलांडली कि सगळे तुझेच.  जी जमीन आज सात बाऱ्याच्या रेषांनी विभागलीय. तो कागद , त्या भिंती, ती माणसे कोणीही तुझी नाहीत ना कधी होती. तू आणि फक्त तूच सत्य आहेस. तू गेलास कि सर्व संपले. या व्यवहारी जगात प्रत्येक नाते फायदा आणि तोटा यावरच चालत असताना तू स्वतःशी मात्र कधी अप्रामाणिक होऊ नकोस. 



ree

हजारो तास चाललेल्या चर्चा, कट्ट्यावरचा चहा, वाचलेली पुस्तके , साठविलेले पैसे हे सर्व कशासाठी ? जिवंतपणे घेतलेला श्वास , मोकळी हवा आणि निसर्गाचा प्रत्येक क्षणी चाललेला उत्सव एव्हढेच काही ते सत्य. जिथे मी पण गळून जातो, मन उरत नाही आणि फक्त आणि फक्त अनुभव आणि आनंद उरतो.

ree

आणि हे अनुभवायला मला कुठले तत्वज्ञान, कुठल्या समूहात जाण्याची आणि त्यांच्या पुढे पुढे करण्याची गरज भासत नाही. कारण सत्य हे त्रिकालाबाधित असते. त्याची भाषा हि शब्दातीत आणि प्रत्यक्ष अनुभवाची असते. आणि असा हा माझा गुरु म्हणजेच निसर्ग जो मी जसा त्याला सामोरे जाईल तसा तो अनुभव देतो. त्यामुळे फिरत राहा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. 



ree

शब्द आणि छायाचित्र : योगेश कर्डीले 

मॉडेल : के वसुंधरा

All rights reserved.


Comments


Join our mailing list

  • YouTube Social  Icon
  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Flickr Social Icon
  • Instagram Social Icon

© Raginee Yogesh Kardile

Any text / image / video from the site

must not be used without prior permission. 

bottom of page