अंतराळात भ्रमण करणारी पृथ्वी एका रात्री ज्यावेळी विशिष्ट अवस्थेतून जात असते. आणि अशावेळी वैश्विक ऊर्जेच्या संक्रमण काळात अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या त्या शिव तत्वाप्रती कृतज्ञा आपण व्यक्त करतो ती रात्र म्हणजे महाशिवरात्र.

आपल्या पूर्वजांनी दाखवून दिलेल्या मार्गावर मग आपण श्रद्धेने त्या शिव तत्वाला मानवी स्वरूपात किंवा लिंग स्वरूपात कल्पना करून पूजन करतो. कोणी दूर वनात वा गुहेत ध्यानस्थ होते किंवा कोणी भजन आणि नृत्याद्वारे आनंद साजरा करतात. ज्या पंच महाभूतांमुळे आपला अविष्कार या धरातलावर अविष्कार झाला त्यांच्या साहाय्याने आणि जिच्या मायेने चैतन्य आपल्यात प्रविष्ट झाले त्या शक्तीच्या आधारे शिवाची मानवी स्वरूपात कल्पना करतो.

अणुरेणूत भरून उरलेली सर्जनशील आणि स्फोटक शक्ती, सर्व पदार्थांना आपल्या आत जागा दिलेले अवकाश आणि सर्वशक्तिमान असा काळ या सर्वांच्या पलीकडे असणाऱ्या शिवाची कल्पना करताना शेवटी पंचेंद्रियेच वापरतो. परंतु कळिकाळाला देखील ज्याचा अंत लागला नाही असा तो महाकाल. रुद्र स्वरूप आणि भोळा सांबही तोच. सर्वोत्कृष्ट पुरुष आणि प्रियकर देखील तोच. सर्वात क्रुद्ध आणि दयेपोटी विष पिणारा निळकंठ देखील तोच. हजारो वर्षे प्रणय करणारा आणि एका क्षणात कामदेवास भस्म करणारा स्मशानवासी देखील तोच. रेतीच्या कणात, प्रत्येक मानवात आणि ब्रह्मांडाला व्यापून उरलेला देखील आद्य पुरुष तत्व तोच. निश्चल समाधी सुखात अनंतात रमलेला परंतु प्रकृतीच्या प्रेमाखातर नृत्य करून सर्व कलांचा उद्गाता नटराज आणि तांडव करून त्या सर्व सृष्टीचा लय करणारा शिवदेखील तोच.

त्याला ज्यांनी अंतर्चक्षूंनी अनुभवले. हा निसर्ग म्हणजेच तो आणि त्याचाच अविष्कार आहे जाणले आणि आणि पुढच्या पिढ्यांना शिकवले त्या गुरु परंपरेला, संस्कृती आणि वैश्विक धर्म परंपरेस वंदन. अकार, उकार आणि मकार यांचा उद्गम असलेला प्रणव म्हणजेच ओंकार ज्यांनी आपल्याला दिला. या रात्री सर्व विश्व व्यापिलेला नादस्वरूप प्रणव याचे उच्चारण करून सर्वत्र भरून उरलेल्या शिव तत्वाला आवाहन करूया. निसर्ग, धर्म, कला आणि विज्ञान यांच्या सुरेख सांस्कृतिक संगम असलेली ही महा-शिव-रात्र आपापल्या परीने साजरी करूया. ओम नमः शिवाय .
Comments