पालखीवर उधळलेले भंडार खोबरे
सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरी गडावर जाण्याचा योग यावर्षी आला. पुरंदर तालुक्यातील जगप्रसिद्ध धार्मिक ठिकाण माहित नाही असा मराठी माणूस असणे शक्य नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विविध खेड्यांतून येथे भाविक येतात. यावेळी ३० मे या दिवशी आम्ही देखील गेलो. सोमवती अमावास्ये निमित्त पालखीचे दर्शन आणि सोहोळा पाहणे हा एक उद्देश.
भंडार खोबरे विक्री : देवस्थान परिसरातील एक दुकान
तसे पहिले तर भारताची खरी ओळख ही फक्त ज्ञान, कला आणि व्यापार यापुरती सीमित नसून ती येथील बहुजनाच्या जीवनातून होते. खेडी, वाड्या, वस्त्या, माळराने येथे विखुरलेल्या समाजाच्या जीवनातून, उत्सवातून आणि रंगांमध्ये होते. भोळ्या भाबड्या जनतेच्या देवतांमध्ये देखील जनताच प्रतिबिंबित होते. तसेच त्यांच्या उपासना व उत्सव साजऱ्या करण्याच्या पद्धतीतून ते डोकावते. आपण कितीही मोठे झालो ( असा गैरसमज असला ) तरीही आपले मूळ हे कोठेतरी खेड्यामध्येच असते.
भाविक
आणि आपले दैवताचे दर्शन करणे हा आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांवरचा रिवाज असतो. त्यामुळे कुठेतरी आपण परत आपल्या जमिनीशी आणि समाजाशी जोडलो जातो. महाराष्ट्रातील बहुतांश समाजाचे जेजुरीशी नाते खूप पूर्वीपासून जोडले गेलेले आहे.
पालखीपुढचे भंडारामध्ये न्हाऊन निघालेले भाविक
अशा या जेजुरीचा रंग तो सोनेरी पिवळा. कऱ्हेच्या तीरापासून ते खंडेरायाच्या गाभाऱ्यापर्यंत उधळलेला भंडारा हीच महाराष्ट्राची ओळख. हिमालयातील कैलासानंतर आपले दुसरे महत्वाचे स्थान ते गड जेजुरी. शंभू महादेवाचा एक अवतार आणि अठरापगड जातींना एकमेकांमध्ये घट्ट विणणारे दैवत म्हणजे मल्हारी मार्तंड (खंडोबा) .
देवाची पालखी
आधी शंका होती कि प्रचंड गर्दी आणि उन्हामध्ये दर्शन शक्य होईल का ?
परंतु प्रत्येकाला येथे जागा मिळते. सुदैवाने आम्हाला देखील मिळाली. साधारणतः ११ वाजता पालखी खाली कऱ्हा नदीवर स्नानास प्रस्थान करते. पोत्याने भंडारा येथे भक्तांवर उधळला जातो. हवेत फक्त हळदीचा सुवास घुमतो. हळद ही सनातन धर्मात पवित्र आणि आरोग्यदायी मानतात तसेच खोबरे देखील. त्याची लयलूट सर्व परिसरात असते. त्यामुळे सर्व गाव त्या सुगंधात बुडालेला असतो. साधारणतः आसपासची मंदिरे फिरून पालखी रात्री मंदिरात परत येते. जगात असे फक्त भारतात आणि आपल्याकडेच महाराष्ट्र / कर्नाटक भागातच होते.
कपाळावर भंडारा लावताना एक बाबा
अतिशय गर्दी आणि ऊन असले तरीही भावना आणि उत्साह मात्र ओसंडून वाहतो. आकाशातून सूर्यनारायण आग ओकतो आणि खालून लोक भंडारा उधळतात. आपल्या पद्धतीने पारंपरिक वस्त्रे परिधान करून स्त्री पुरुष आणि बाळ गोपाळ यांचा मेळावाच येथे अनुभवायला मिळाला. प्रत्येकाच्या डोळ्यात उत्साह आणि आनंद कडक उन्हाला देखील शांत करतो. भारत अशा छोट्या मोठ्या उत्सवांतून, समाजाच्या जागरातून व्यक्त होत असतो आणि वर्षभरातून एखादवेळी होणाऱ्या उत्सवातून संपूर्ण वर्षभराची ऊर्जा देऊन देतो.
घरच्या देव्हाऱ्यातील देवांना जेजुरी दर्शन
लग्न झालेली नवदाम्पत्य देव दर्शनाला येथे येतात. लहान मुले जत्रेला, कोणी नवस फेडायला, कोणी मागणे मागायला तर कोणी फक्त दर्शनाला गडावर येतात. स्त्री , पुरुष, किन्नर आणि प्राणी या सर्वांना येथे प्रवेश आहे. अशा वेळेस मग वाटते कि काही जागा सोडल्यातर बहुतेक देवस्थानात भेदभाव तर बिलकुलच नाही. कोणीही या देव तुमचाच आहे. निसर्गाच्या तत्वांसोबत प्राणिमात्रांची देखील उपासना येथे होते. तुमची सुरवातच नंदीला भंडारा लावून होते, पुढे येते कासव, दाराजवळ कुत्र्याची मूर्ती, कमानीखालून जाताना किन्नरांचा आशीर्वाद घेतला जातो आणि आसपास बिनधास्त फिरणाऱ्या कुत्र्यांवर भाविक भंडारा लावतात आणि तेदेखील निवांत असतात. सर्वसमावेशकता म्हणतात याचे उत्कृष्ट उदाहरण आपल्यासमोरच असते.
भंडाऱ्याने माखलेला नंदी
जेजुरी गड ही जागा धर्मासोबतच इतिहासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे.
मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी प्रसंग म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आणि स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय यांची भेट गडावर झाली. बरेच वर्षे एकमेकांना पाहू न शकलेले पिता पुत्र या पावन ठिकाणी भेटले. तुपाने भरलेल्या परातीमध्ये आपल्या पुत्राचे मुखावलोकन करून त्यांची उराउरी भेट येथे घडली.
देवासमोर प्रार्थना करणारा भाविक
भारतीय संस्कृतीच्या रक्षक माता अहिल्यादेवी आणि संपूर्ण होळकर घराणे यांचा जेजुरी गडाशी ऋणानुबंध तर विख्यातच आहे. त्यांनी केलेला मंदिराचा जीर्णोद्धार आणि आज जे स्वरूप या पवित्र वास्तूला मिळाले आहेत त्याला कारण होळकर संस्थान आहे. त्यांचे गड परिसरातील पुतळे आज आपणास प्रेरणा देतात. यासोबतच थोर क्रांतिकारी वीर उमाजी नाईक यांचा पुतळा प्रवेशद्वाराच्या अगोदरच दिसतो. ज्यांनी येथेच भंडारा उधळून इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारला होता. आपल्या मुलांना त्यांच्या मुळाशी घट्ट जोडायचे असेल तर अशा स्थळांचे दर्शन आपसूकच गरजेचे आहे.
मंदिराबाहेरचे शिल्प
सोमवती अमावस्या आणि दसरा हे मुहूर्त जेजुरीत येऊन अनुभवायचे असतात. त्याचे अध्यात्मिक महत्व भरपूर आहे. सर्व विषयात खोलवर जात येणे शक्य नाही. परंतु एक चैतन्याने भरलेला अनुभव म्हणून जेजुरीला नक्की यावे. ही भेट आम्हाला खूप काही शिकवून गेली. जे पुस्तकात शिकविले जाते त्याहीपेक्षा खूप काही येथे लोकांच्या संगतीत आल्यावर उमजते. कदाचित प्रवासाचा आणि आपल्या गोष्टींकडे नव्याने पाहण्याचा फायदा आपल्याच लोकांना समजून घेताना होतो.
देवाच्या दारी आलेला एक भाविक
सोन्याची जेजुरी असे का म्हणतात हे प्रत्यक्ष तो अनुभव घेतल्यावर येतो. भारतीयांचा स्वभाव हा उत्सवप्रिय, भावुक आणि रंगीत आहे. त्यामुळे आपले प्रत्येक उत्सव त्याचेच प्रतिबिंब असतात. परंतु या सर्वांमध्ये निसर्गासोबत आपली नाळ जोडली असते. प्रत्येक गोष्टीला एखादे कारण पण असते. कदाचित आपले पालक ते सांगू शकत नसतील. परंतु परंपरेच्या मागे विज्ञान आणि ब्रह्मज्ञान हे दोन्ही एकत्रच येतात.
देवासाठी केलेले नर्तन
मानसिक, शारीरिक, सामाजिक सहभाग हे उत्सवाच्या माध्यमातून माध्यमातून करण्याकडे पूर्वजांचा कल होता. पंचेंद्रियांना अत्युच्च आनंद देऊन एका अवस्थेत घेऊन जाण्याची प्रक्रिया त्या एक एक विधींमधून त्यांनी साधली. कोणाला निव्वळ आनंद हवा, कोणाला त्या तत्वाशी संवाद साधायचा, तर कोणाला आलेली अडचण सांगून मन मोकळे करायचे हे सर्व येथे मुक्तपणे करण्याची परवानगी येथे मिळते. देवासमोर सर्वजण सारखे आणि सर्वांशी त्याचा संवाद होतो. त्यामुळेच जो जे वांछील तो ते लाहो ही प्रथा उत्सवांच्या आणि पूजेच्या प्रक्रियेमध्ये देखील आहे.
दर्शन झाल्यानंतर बाजारात खरेदी करणारा भाविक
शूर आणि वीर समाजाचा देव आणि त्याची उपासना त्याच पद्धतीने व्हायला हवी नाही का ? दाताने खंडा ( अर्पण केलेली तलवार ) उचलणे, नृत्य, देवाच्या नावाचा गजर, जागरण गोंधळ, देवाचा संचार होणे, शेकडो लोकांनी पालखी उत्सवपूर्वक निसरड्या पायरीवरून नदीपर्यंत नेऊन परत देवतांच्या मंदिरातून फिरवून रात्री परत आणणे. या सर्व गोष्टीत माणसाचा कस लागतो. भर उन्हात थकवा येतो. समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. आणि अशा या सामूहिक ऊर्जा आणि धर्माचे अधिष्ठान असल्याकारणाने या सर्वांतून आनंदच मिळतो.
पालखी मार्गावरील पायरी
संस्कृती म्हणजे काय तर लोकांच्या सवयी, कलाकृती, अभिव्यक्ती, परंपरा, आनंद यांची गोळाबेरीज. त्यातून जे सदैव उत्क्रांत आणि प्रवाही होत राहते ती संस्कृती निश्चितच कालौघात टिकून राहणार. जेजुरी तुम्हाला तुम्ही कोण हे विचारीत नाही. हळद ही सर्वांवरच उधळली असते. भंडारा प्रत्येकाच्या डोक्याला लावलेला असतो. आपल्या कानात आणि मनात फक्त येळकोट यळकोट जय मल्हार एवढा एकाच आवाज येत राहतो.
देवदर्शनासाठी आलेले नवदाम्पत्य
भाविकांच्या भक्तीचा आणि भंडाऱ्याचा अभिषेक
देव दर्शनानंतर ( योगेश आणि रागिणी )
देव दर्शनानंतर ( वसुंधरा आणि रागिणी )
छायाचित्र आणि लिखाण : योगेश कर्डीले
सर्व हक्क राखीव.
Comments