top of page
  • Writer's pictureYogesh Kardile

भारतवर्ष, योगी आणि ट्रेकर्स 

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥

ज्याच्या कृपेने मूक व्यक्ती बोलू शकते , अपंग पर्वत  पार करू शकतो . 

अशा त्या परम आनंद माधवला ( भगवंतचरणी ) माझे नमन असो . 


रुद्र प्रताप : महादेवाच्या रूपात 

नमस्कार मित्रहो, मध्ये लिखाणात थोडासा खंड पडला. याशिवाय जो विषय  लिखाणास घेतला त्याचा अभ्यास करण्यास बराच वेळ गेला.  आता परत तुमच्यासमोर आलो आहे भारतवर्ष आणि योग या सदराच्या दुसऱ्या भागात. भारताची नीट ओळख व्हायची असेल तर देशाटन महत्वाचे आहे. आणि त्याचा छंद  २० वर्षांपूर्वी  लागला.  साधारणतः १४ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश फिरल्यावर थोडा अनुभव गोळा झालाय. माझ्या भटकंतीची सुरवात झाली ती सह्याद्रीतुन. पुण्यात फर्गसन  कॉलेजला असताना आम्हा होस्टेलवासीयांचा शनिवारचा उद्योग म्हणजे ट्रेकिंग. कमीत कमी पैशात डोंगरकिल्ले फिरायचे कधी  बस, रेल्वे,  स्थानिक जीप  नाहीतर लोकल. २० वर्षांपूर्वी लागलेली ती सवय. आता मागे वळून पाहतो ते ट्रेकिंग क्षेत्रात आमूलाग्र  बदल झालाय. लाखो युवक / युवती , लहान मुले आणि वृद्ध देखील  काश्मीर ते कन्याकुमारी  आणि मेघालय ते पंजाब फिरतात. सोशल मीडियामुळे या क्षेत्राला ग्लॅमर आले. नवनवीन प्रकारचे ट्रेकिंग गियर्स, कपडे यांनी तर ट्रेकिंगचे रुपडे बदलले. अनेक परदेशी आणि स्वदेशी कंपन्यांचा व्यापार देखील फुलला. प्रत्येक शनिवार रविवार अनेक किल्ले आणि पर्वत शिखरांवर शेकडो लोक असतात. इतकेच काय एव्हरेस्टवर देखील रांगा लागतात. या लेखाचा मुद्दा नक्कीच टीका करणे हा नाहीय .त्या विषयात खोलवर जाणे देखील नाही. पण ट्रेकिंगचा कुठेतरी खूप मागे हरवलेला दुवा आपल्या  देशातील साधू / योगी लोकांशी मात्र नक्कीच आहे तो जोडण्याचा  प्रयत्न. त्या परंपरेविषयी मात्र सविस्तर मला इथे काहीतरी मांडायचे.


धांकार बुद्ध मठ ( पिन व्हॅली , हिमाचल प्रदेश ) थोड्या वेळाकरिता असा विचार करा कि जगातील सर्वात जुना ट्रेकर हा भगवान शिव आहेत. आणि त्याच्या या हजारो वर्ष जुन्या संस्थेतील सप्तर्षी हे आहेत रिजनल हेड्स ( विभाग प्रमुख ). त्यांच्या नंतर आहेत त्यांचे भारतभरातील शाखा प्रमुख. या सर्वांच्या आहेत हजारो वर्षाचे जुने बेस कॅम्पस ( आश्रम आणि मंदिरे) .कोणी आहे हरमुख पर्वतापाशी, कोणी श्रीखंड कैलासावर, कोणी आदी कैलास, बद्रीनाथ, केदारनाथ, हरिश्चन्द्रगड, अगस्त्यमलायी, तर कोणी नर्मदेच्या जंगलात इत्यादी . कुठे कुठे नाहीत हे बेस कॅम्पस !  आणि हजारो वर्षांपासून येथे येताहेत करोडो ट्रेक्सर्स ( भावीकभक्त ) .ते देखील हातात एक काठी , कमंडलू , झोळी घेऊन. कोणी  महादेवाच्या, विष्णूच्या तर कृष्णाच्या स्थानिक देव किंवा देवीच्या भक्तीत मग्न. राहायचे कुठे , खायचे काय याची चिंता नाही. सर्व काही त्याच्यावर सोडलेले. जगाच्या दृष्टीने हा देश गरिबांचा. पण यांच्यासाठी मात्र  मनाची श्रीमंती सगळीकडे पाहण्यास मिळते. खेडेगावातच नाही तर दुर्गम भागात देखील . 

नर्मदा परिक्रमावासी 


 जर स्वतः चा  अनुभव सांगायचे झाले तर साधारणतः वीस वर्षांपूर्वी मित्रांसोबत मी लोणावळा  ते  भीमाशंकर ट्रेकला निघालो होतो  ते देखील जुलैच्या तुफान  पावसात. त्यावेळेस जास्त लोक हा ट्रेक करीत नव्हते. त्यामुळे धोपट मार्ग असा नव्हता आणि भर पावसातुन जंगलात दिसण्याची शक्यता तशी कमीच  . पाहिल्या दिवशी जोशमध्ये शिवकालीन  कुंडेश्वर मंदिरापर्यंत पोहोचलो आणि  मुक्काम केला . दुसऱ्या दिवशी सकाळी पुढे निघालो . पण दाट  धुक्यात आणि सोबत कोणीही अनुभवी वाटाड्या नसल्याने आम्ही हरवलो. शेवटी परत मंदिरात थकून आलो.  शंकराला प्रार्थना केली कि देवा रास्ता दाखव नाहीतर आम्हाला परत जावे लागेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चिमा बगाड या वृद्ध बाबांच्या रूपात आम्हाला एक वाटाड्या मिळाला. अरे पोरांनो तुम्ही महादेवाला चाललात आणि उद्या तर सोमवार आहे .चला मी येतो . मला फक्त तुमच्याकडची फक्की ( ग्लुकॉन डी ) द्या . जेवायला नसेल तरी चालेल. आमच्या पुढे चालत राहून बाबांनी आम्हाला भीमाशंकरचे दर्शन घडवले. आम्ही तेथून बस मध्ये बसून पुण्याला गेलो . आणि बाबा परत त्यांचं मार्गाने दोन दिवसाचा प्रवास एकट्याने करत त्यांच्या गावी गेले. त्यांच्या सोबत काय होते तर फक्त एक छत्री. 


चंद्रभागा १३ पर्वतशिखर  ( लाहोल हिमालय ) 


असाच  एक अनुभव हिमालयात केदारकंठाला आला. दोन दिवस पर्वतावर ट्रेक करीत गेल्यावर महादेवाचे दर्शन झाले. जंगल अतिशय उत्तम होते पण वरच्या भागात बर्फ आणि थंडी देखील जोरात होती. वर पोहोचल्यावर मंदिर दिसले आणि काळ्या ढगांसोबतच पाऊस व हिमवर्षाव सुरु झाला. खाली जाणेहि अवघड आणि वर कॅम्प करणे सुद्धा. अनघा दहा वर्षाची, रागिणी, मी आणि सोबतच तीन स्थानिक गाईड मुले . पण सुदैवाने एका मोठ्या दगडाच्या कपारीवजा गुहेत भेटली तिच्यात रात्र काढली. सकाळी उठलो तर सर्वत्र शुभ्र बर्फाची चादर आणि गोठविणारी थंडी. अशा वातावरणात स्वर्गरोहिणी पर्वताचे नयनरम्य दर्शन देखील घडले. तिन्ही मुलांनी आमची उत्तम काळजी घेत आम्हाला सुखरूप खाली पोहचविले महादेवाची आणि त्या मुलांची कृपा . 

केदारकंठातील गुहेत मुक्काम 

मध्य प्रदेशात मंडु या पर्यटनस्थळी जंगलातुन जाताना  रस्त्यात महाराष्ट्रातील यात्रिक  भेटले. विचारपूस करताना कळले कि त्यातला एक जण श्रीराम खालकर नावाचे निवृत्त पोलीस अधिकारी. पण नर्मदा मातेच्या श्राद्धे पायी कुठलेही बंधन सोबत न घेता  त्यांचे दोन साथीदारांसोबत अनेक महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेच्या खडतर यात्रेवर निघालेले. त्यांना विचारले काही अडचण 

तर त्यांचे उत्तर एकच सर्व भार नर्मदेवर. येथील लोक गरीब असले तरीही दोन घास तुम्हाला निश्चित देणार . यात्रेकरू म्हणजे साक्षात देवाचे रूप हा त्यांच्यातील विश्वास. तुमच्या कडेही अशाच अनुभवांची पोतडी असेल. मनात विचार येतो की आपल्या देशवासियांत मग ते  श्रीमंत आणि गरीब असो ही ऊर्जा कुठून येते ? आदिमानवापासून भटकण्याची वृत्ती सर्व मानवात आहे.  तिचा उद्देश नवीन जागा शोधणे आणि भूक भागविणे याच्याशी संबंधित जास्त.परंतु ज्ञान प्राप्ती,  आत्म विकासासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी , इतिहासातून ऊर्जा घेण्यावाठी निसर्गात जाण्याची परंपरा आपल्या देशात जाणीवपूर्वक निर्माण करणारे योगीच हेच आपले खरे ट्रेक लीडर्स. 


स्वर्गरोहिणी पर्वत दृश्य

आजच्या या लेखात मला तुम्हाला त्या जंगलात गेलेल्या आणि इतरांना प्रभावित केलेल्या योगी आणि त्यांच्या परंपरे विषयी सांगायचे आहे. आपला देश हा जवळपास जगभरातील साधारणतः सर्व प्रकारच्या निसर्ग परिसंस्था आणि वातावरण लाभलेला आहे. वन्य जीवन आणि भौगोलिक विविधता ही प्रचंड आहे. आपली  संस्कृती खूप पूर्वी पासून अफगाणीस्थान ते ब्रह्मदेशापर्यंत आणि पुढे श्रीलंकेपर्यंत अखंड प्रवाहित होती. त्यामुळे इथे मी त्या सर्व भागाला सांस्कृतिक आणि भौगोलिकरित्या  भारत असे संबोधतो. कुठलाही  लांब पल्ल्याचा प्रवास मग तो ट्रेक, हाईक, पर्वतारोहण, प्रस्तरारोहण, परिक्रमा, वारी, यात्रा, मेळा, कावड, जत्रा या विविध  स्वरूपात असला तरी अंतिमतः  प्रवास या सदरात मोडतो. त्यात एक गोष्ट निश्चित असते कि आपण एका स्थान पासून दुसऱ्या स्थानापर्यंत जातो. आणि या कृतीत कळात, नकळत काहीतरी शिकतो.

कुरुक्षेत्रावर कर्म योगाचे  तत्वज्ञान श्रीमद भगवद्गीतेद्वारा सांगणारे वक्ता भगवान श्रीकृष्ण आणि श्रोता वीर योद्धा अर्जुन

 शिल्प : परमार्थ निकेतन , ऋषिकेश 

या सर्व कृतीत एक गोष्ट निश्चितरूपात  होते ती ऊर्जेची देवाणघेवाण .भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीतून आणि निसर्गातून  आपण आपल्या गरजेनुसार ऊर्जा घेतो किंवा त्याला देतो. कधी गप्पा , निरीक्षण, प्रत्यक्ष अनुभूती, ध्यान, भजन, गाणी गाणे, मस्त जेवण काहीही . हे सर्व आपल्या स्मरणात राहते आणि  आपल्या पुढच्या प्रवासाला हीच ऊर्जा प्रेरणा देते.अशी ही  उर्जास्थाने आणि लोक  जाणीवपूर्वक निर्माण करण्याचे कार्य केले ते  योगी लोकांनी आणि त्यांच्या दात्यांनी ( राजे / व्यापारी ). त्याचा उपयोग फक्त भाविकांनाच नाही तर प्रवासी, व्यापारी लोकांना आसऱ्याकरिता देखील झाला. म्हणूनच सह्याद्रितील प्रत्येक घाटवाटांवर आजही लेण्या दिसतील . 


केदारकंठा ट्रेकमधील एक क्षण 

ज्यांना ध्यानातं मग्न व्हायचे होते त्यांनी  जंगलांचा आणि गुहांचा आश्रय घेतला आणि आपलेज्ञान योग्य वेळ आणि योग्य शिष्य भेटला कि त्यांना देऊन परंपरा चालू ठेवली. ज्यांना ज्ञानदान करायचे होते त्यांनी आश्रम / गुरुकुल चालविले. आदी गुरु शंकराचार्यांसारख्यांनी पीठ आणि मंदिरे स्थापन केली जेणे करून जगभरातून लोक दर्शनास येऊ शकतील.

कोयना  अभयारण्य 


तर मार्कंडेय ऋषींसारख्यांनी नर्मदा परिक्रमा सुरु केली. उद्देश इतकाच कि कुठल्यातरी मार्गाने मानवाने आपला विकास करून घ्यावा. सर्वच लोक ध्यानस्थ राहू शकत नाही , किंवा ज्ञान ग्रहण करू शकत नाही. काहींना फिरायला आवडते , तर काहींना  कार्यात मग्न राहायल आवडते. म्हणून ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे आणि रुची प्रमाणे लोकायत , महानुभाव , शीख , बुद्ध , जैन , भक्तीयोग , कर्म योग , ज्ञान योग, हठ योग, तंत्र मार्ग, वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय असे अनेक मार्ग तयार झाले. ज्याला जे जे भावले त्याने ते ते अवलंबिले. 

कृष्णा  आणि रमेश ड्युक्स नोझ वर प्रस्तरारोहण करताना

यात फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हती तर अनेक स्त्री संत, योगिनी देखील होत्या. यातील अनेक जणी भारत भ्रमंती केली. काहींनी जंगलात वस्ती केली तर काहींनी  समाजात येऊन भक्ती संप्रदायाची चळवळ पुढे चालवली. 

 काश्मीरमधील लल्लेश्वरी ( लाल देढ ) , चित्तोडगढावरील मा मीराबाई , महाराष्ट्रातील मुक्ताबाई , संतामाई , दक्षिणेतील अक्का महादेवी , बंगाल मधील शारदा माता अशा एक ना अनेक स्त्री योगिनी होऊन गेल्या ज्यांचे अनेक शिष्य झाले . 

यूरोपात जसे स्त्रियांना धर्म विरोधी असल्यावर चेटकीण म्हणून जाळले तसे आपल्याकडे झाले नाही . एवढेच काय तर गार्गी , मैत्रेयी , आम्रपाली , उभय भरती या स्त्रियांनी थोर मोठ्या पंडितांसोबत झालेल्या चर्चेमुळे आणि भक्तीमुळे  विख्यात आहेत . 


कृष्णा  नदीवरील मेणवली घाट,  वाई कोणी गुरु पुरुष केला, तर कोणी स्त्री , कोणी जंगलात गेले , कोणी नदीकाठी, तरकोणी संसार करीत भक्ती केले. 

कबीर, ज्ञानेश्वर , तुकाराम , मध्वाचार्य , शंकराचार्य, रमण महर्षी , अरबिंदो , लाहिरी महाशय , विवेकानंद , अय्यंगार  आणि अशी अनेक व्यक्तिमत्वे  म्हणजेच भारताची खरी ओळख . यांची गीते , अभंग , कार्य , ग्रंथ आजही समाजाला दिशा दाखवितो. 

माता मंदिर , चितकुल ( किन्नौर कैलास पर्वतरांग ) 


वशिष्ट, विश्वामित्र, सांदिपनी, कपिल, वेद व्यास अशा महान ब्रह्मर्षींचे आश्रम हिमालयात आणि अनेक पर्वतांमध्ये होते.   चरकमुनींची रसायन शाळा हिमालयातील जंगलात होती. अगस्त्यांनी दक्षिणेकडे  केरळतील  अगस्त्यमलायी ( सह्याद्रीतील एक पर्वतशिखरे ) या ठिकाणी साधना केली. आजही हा परिसर दुर्मिळ वनस्पतींचे केंद्र मानला जातो. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगर , संत रामदासांनी सज्जनगड , शिवथरघळ याठिकाणी साधना आणि ज्ञानदान केले , गौतम बुद्धांचे मठ तर हिमालयाच्या आणि पलीकडील तिबेटच्या अति दुर्गम भागात इतकेच काय तर पामीर पर्वतरांग आणि पुढे जगभर पसरले. नाथ संप्रदायातील नवनाथांचे भारतवर्षात आणि नेपाळ मधील अध्यात्मिक कार्य तर जगद्विख्यात आहे . 

त्यांचे नाव नेपाळमधील समुदाय अभिमानाने त्यांनी दिलेले शस्त्र कुकरी आणि गोरखा नाव धारण करतो . इतकेच काय तर सध्याच्या पाकिस्तान या देशात गोरक्ष पर्वत नावाचा एक डोंगर देखील आहे. 

आनंदी किन्नौर स्त्रिया , सांगला 


आजही अनेक आश्रम आपापल्या परंपरेनुसार वेदोपनिषद, आयुर्वेद आणि योग प्रशिक्षण जगभरातील विद्यार्ध्यांना देतात . त्याचे उत्तम स्वरूप पाहायचे असेल तर ऋषिकेश , हरिद्वार , शृंगेरी, त्र्यंबकेश्वर अशा ठिकाणी  जावे. पर्वतारोहण हा प्रकार दोन तीनशे वर्षांचा समाजात रूढ झाला.त्याच्याही खूप आधी हे योगी हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात पर्वत शिखरांवर होते. जो मानस कैलास कोणीही चढू शकत नाही तो महान बुद्धिस्ट योगी मीलरेपा साधारणतः १० व्या शतकात वर जाऊन आले होते .  जेव्हा यूरोप अंधार युगातून ( Dark Age ) जात होता तेव्हा आपल्याकडे अध्यात्म आणि विज्ञान दोन्हीतही लोक प्रगतीपथावर होते.आजही अति थंडीत महादेवाच्या स्थानी साधू बर्फात निवांत राहतात. केरळच्या जंगलात शबरीमलाच्या यात्रेला संपूर्ण दक्षिण भारतातून लोक येतात . 
हरिश्चन्द्रगडावरील मंदिर 


 फिरण्यात आणि भक्तीत मश्गुल असलेल्याला लोकांना आजही बद्रीधाम, केदारधाम, आणि पंच कैलास बोलावतात . पंढरपूरला न बोलावतात लाखो लोक महाराष्ट्रातून जातात . नर्मदा परिक्रमा करण्यासाठी तर म्हणतात माँ नर्मदा तुम्हाला बोलावते तेव्हाच ती यात्रा होते. खडतर आणि निसर्गरम्य प्रवास आपल्यापूर्वी करोडो लोकांनी या देशात केले आहेत. मग  एक साधासा विचार मनात येतो. हजारो वर्षांपूर्वी पासून लोक कसे काय हे डोंगर चढत असतील ? जेव्हा सोबत ना सुविधा, ना नकाशा तरीही चिकाटीने साधक तो डोंगर कसा पार करीत असेल ? योग , आयुर्वेद आणि इतर अनेक विज्ञान शास्त्रे आपल्याकडेच का तयार झाली ? हे सर्व योगी निसर्गातच का गेले ? गुरुकुल आणि गुरु - शिष्य संवाद परंपरा भारतातच का टिकली ? वन्य प्राण्यांना त्रास न देता त्यांच्या सह जंगलात हे लोक कसे राहिले ? हे प्रश्न कधीतरी आपण स्वतःला विचारायला हवे .

स्पिती व्हॅली हिमशिखर


या देशात योगी बनण्यासाठी ना जातीपातीचे बंधन होते ना  स्त्री पुरुष असण्याचे. जगभरात जसे सगळीकडे भेद आहेत ते इथेही होते. जगभरात जसे अत्याचार झाले तसेच ते  इथेही झाले. पण जगभरात जे  कुठेही जागृती झाली नाही ती मात्र आपल्याकडेच झाली. आणि अशा लोकांनीच जगाला तारले आहे. नाहीतर सत्ता आणि जमिनीसाठी युद्धे , हत्याकांडे चालूच आहेत.भारताचे असणे हे जगासाठी गरजेचे आहे. आणि देश हा नेहमी तेथील माणसांनी आणि त्यांच्या विचारांनी बनतो व बिघडतो. आपल्या देशाची मूलप्रवृत्ती ही हजारो वर्षांच्या मानवी मनांच्या मशागतीतून या योगी, संत आणि साधूंनी बनविली आहे. म्हणूनच आज कुठल्या हि झोपडीत किंवां कोण्याच्या शेतात  गेल्यावर तिथला शेतकरी तुम्हाला  चहा पाणी किंवां जेवायला बोलाविले.  आजही समाज यात्रेकरूंवर विश्वास ठेवतो आणि प्रेम करतो कारण त्याची श्रद्धा हि तुमच्यावर नसून तुमच्या रूपात आलेल्या अतिथीवर आहे. कधी एकदा नर्मदा परिक्रमा किंवा पंढरीच्या वारीला जा.


बुद्धिस्ट मंक 


 हिमालयात महादेवाच्या दर्शनाला जा गरम गरम जेवण तुम्हाला भंडाऱ्यात/लंगर मध्ये नक्की मिळेल  आजही अनोळखी व्यक्तीच्या घरी उशिरा देखील गेले तरी आपल्या माथ्यावर  बंदूक कोणी रोखीत नाही. रस्त्यावर गाडी बंद पडली तर कोणी ना कोणी पेट्रोल देतो व लिफ्ट देतो. पूर आला, महामारी आली स्वयंवसेवक तयार होऊन लोकांना मदत करतात, लंगर उभे राहतात. याला कुठेही शासन तुम्हाला सांगत नाही तर अंतः प्रेरणेने लोक करतात . आणि हि  सामाजिक अंतः प्रेरणा निर्माण आणि  टिकवून ठेवण्याचे श्रेय आहे त्या हजारो लाखो साधू संतांना.  या साधू वृत्तीच्या लोकांनी आपले आयुष्य अर्पण करून शिष्यांची एक परंपरा निर्माण केली. तसेच त्यांना आश्रय देणारा समाज देखील. काळानुसार आणि लोकसंख्या वाढीमुळे जरी काही चुकीच्या प्रवृत्तीचा शिरकाव झाला असला तरी मूलस्रोत आणि प्रेरणा हि आजही निस्वार्थ आहे .


हिमाचली  मेंढपाळ ( गद्दी ) 


जेव्हा कोणी तरी बाहेरच्या देशातील किंवा आपल्याच देशातील एखादा आपल्या परंपरेच्या विरोधात बोलतो आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो तेव्हा फक्त या नावांपैकी एकाच्या आयुष्यावर नजर टाका. त्यांच्या उपदेशातील एक वाक्य जागून दाखवा. किंवा काही दिवस सुख सुविधांपासून दूर एखाद्या गुहेत शांत बसून पहा.  मग कदाचित आपल्या बोलण्याचा सूर वेगळाच असेल. 
जगभगरात हाच एकमेव देश होता जीथे रूढ धर्माच्या विरुद्ध जाऊन त्यातील चुकीच्या  रूढी वारंवार दुरुस्त करून तेजस्वी रूप प्रदान करण्याचे आणि गरज पडली तर नवीन  पंथ सुरु करण्याचे कार्य येथील योगिजनांनी केले . त्यामुळे जगाला भारताची गरज आहे. आणि भारताला योगिजनांची.  विचार करा पतंजली , सुश्रुतविवेकानंद, आद्य गुरु शंकराचार्य, गो नि दांडेकर, गुरु नानक यांच्या भ्रमंतीने जगाला काय दिले ? त्यांच्या भटकंतीचे आणि कार्याचे फळ आजही समाज चाखतोय. शरीररूपी अस्तित्व संपले तरी त्यांचे शब्द निराशेच्या गर्तेतून अनेकांना वर काढतात. ज्यांनी हि हिमशिखरे, जंगले, नदीकाठ आपल्या साधनेने पवित्र केले  आणि आपल्याला स्वतःची शक्ती ओळखण्याचा आणि निसर्गाशी जोडण्याचा मार्ग दाखवला  ते माझ्यामते  खरे  गिर्यारोहक तेच.  त्यामुळे भरपूर फिरा  डोंगर, दर्या, समुद्र किनारे, मंदिरे, गुहा, शहरे सारे सारे काही पहा. सोबत अनुभवांची गाठोडे तयार होईल . स्वतःला आणि आपल्या देशाला ओळखायला त्याच्या सारखा मार्ग दुसरा कुठला नाही. 


योगेश : चंद्रभागा १३ पर्वतशिखर 


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

पक्षीही सुस्वरे। आळविती।।

येणे सुख रुचे एकांताचा वास।

नाही गुणदोष। अंगी येत।।

जगद्गुरू तुकाराम महाराज


23 views0 comments

Comments


bottom of page