जगाचा इतिहास हा नेहमी युद्धाच्या भाषेत सांगितला जातो. कोणी किती लोक मारले, किती मोठा भाग ताब्यात घेतला. किती किल्ले मोठे महाल, मंदिरे, चर्च, मशिदी आणि थडगे बांधले यातच इतिहास अडकलेला असतो. आणि अशा वेळेस युद्ध, जिंकलेला भूभाग यात क्रूरतेच्या बाबतीत सर्वात आघाडीवर कोणी असेल तो प्रसिद्ध होतो. त्यात चेंगीझ खान आणि त्याचे वंशज. चेंगीझ खानाने त्याच्या काळात जगाची १० % ( ४ कोटी ) लोकसंख्या क्रूरपणे संपवली. तसेच कार्य तैमूर लंग ( लंगडा ) याने १ कोटी ७० लाख लोक संपवून केले. मग त्यांचा वंशज देखील कर्तृत्ववान हवा नाही का ! त्यांच्या दोघांच्या रक्ताचा वारसा एकत्रितपणे पुढे चालविणारा वंश बाबूरच्या रूपाने फरगाना खोऱ्यातून ( उझबेकिस्तान ) अफगानमार्गे भारतात आला. पुढील सहा पिढ्या त्यांनी जो धुमाकूळ येथे घातला त्याला तोड नाही. त्यांचा उच्चांक गाठल्याचे काम केले ते औरंगजेबाने.
महाराणी ताराराणींचा पुतळा : कोल्हापूर
राजपूत असो, शीख, जाट, डोग्रा, उत्तर भारतीय,आहोम किंवा मराठा योद्धे या सर्वांचा कस त्याने काढला. काहींनी आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले. तर काहींनी स्वार्थासाठी स्वतःला आणि मायभूमीला विकले. अनेक स्त्रियांना पडद्याआड जावे लागले आणि कित्येकींनी तर आत्मदहन केले. पण हा लेख इतिहास खरा खोटा करण्याबद्दल नाही. किंवा मुघलांच्याकडे फक्त तिरस्काराने पाहण्याचा देखील नाही. तर इतिहासाकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याचा आहे. युद्धे हि पुरुषांनी लढली तर दुःख स्त्रियांनी भोगली. मानहानी, पिचवून टाकणारे कर, बलात्कार, धर्म परिवर्तन, कलाकृती आणि प्रार्थना स्थळे यांचे नुकसान या सर्व गोष्टींना भारतीय समाजास सामोरे जावे लागले. आणि याचाच परिणाम सांस्कृतिक खच्चीकरणात होतो. जे जे देश आक्रमकांनी काबीज केले त्या देशांच्या धर्म, संस्कृती, कला आणि चालीरीती लोपल्या. बहुतेक तर कायमच्याच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका, आफ्रिका, दक्षिण आशिया, ऑस्ट्रेलिया, सेंट्रल आशिया इत्यादी. दुर्दैवाने आक्रमणकर्ते देश सोडून जरी गेले तरी त्यांचा वारसा चालवणारे लोक आजही आपल्याच बांधवांशी युद्ध करतायत.
आक्रमणे झाली ती नैसर्गिक समृद्धी, खजिना आणि स्त्रिया या गोष्टीत डोळ्यासमोर ठेवून. जिकडे निसर्गाचा समतोल आणि संस्कृती नाही तेथील लोक हे सांस्कृतिक आणी मानवी मुल्यांच्यादृष्ट्या मागासलेले राहिले. अशा या रानटी लोकांनी नेहमीच भारतावर डोळा ठेवला. मग त्यांच्या टोळ्या खैबरमधून सिंधू पार करून भारतभर आक्रमण करू लागल्या.या सर्व काळात आक्रमणकर्ते राज्यकर्ते झाले , त्यांची आणि त्यांच्या जवळच्याच लोकांची भरभराट झाली. पण बहुतांश समाज त्या राजाला किंवा राज्याला स्वतःचे मानीत नव्हता.
अशावेळेस स्त्रियांची भूमिका इतिहासात काय असेल. त्यांच्या मनात काय विचार येत असतील ? जेव्हा आपले वडील, भाऊ, पती यांचे कार्य, युद्ध आणि त्यात झालेले मृत्यू हे ती अनुभवीत असेल. पती दूरवर युद्धात, मोठा मुलगा देखील त्याच्यासोबत. इतिहास फक्त मनगटे घडवीत नाही तर मनातला संकल्प तो अंधकारात देखील चेतवीत असतो. पतीपासून लांब असताना सुद्धा राज्यकारभार करीत स्वतःमधील ज्योत तेवत ठेवून धाकट्या मुलाला घडविले. आणि स्वराज्याचे स्वप्न त्याच्या रूपाने साकारले. त्या मायाळू पण न्याय निष्ठुर होत्या ; देशाची घडी सावरण्याचे स्वप्न पाहणारी राजमाता जिजाऊ. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्यातील तण निपटून काढण्याचे आणि नवनिर्मितेचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांनी केले. आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले. पण तरीही संकट टाळले थोडीदेखील टळले नाही. औरंगजेब अनेक वर्ष महाराष्ट्रात वरवंटा फिरवीत होता.
कोल्हापूर : नाना सावंत यांच्या मर्दानी आखाड्यातील खेळाडू
मग स्वराज्य रक्षणास पुढे आल्या त्या राजाराम महाराजांची पत्नी आणि हंबीरराव मोहित्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराराणी. त्यांनी त्याला जेरीस आणून येथेच संपवून टाकला. देशातील सर्वात कडव्या योध्यांचे नेतृत्व तितक्याच ताकतीने केले. कोणाचेही न ऐकणारे मराठे त्यांच्या शब्दावर लढले. एका स्त्रीच्या शब्दावर स्वतःच्या जीवावर उदार का झाले असतील ? स्त्री आणि पुरुष यापलीकडे विचार त्यांच्यासाठी नक्कीच महत्वाचा होता.
या सर्व धामधुमीनंतर पेशवे, शिंदे, होळकर, घोरपडे आणि इतर अनेक सरदारांनी भारतभर कर्तृत्व गाजविले. परंतु त्या सर्वांच्याही पुढे आज भारतभर ज्यांच्या नावापुढे पुण्यश्लोक लावले जाते त्या महाराणी अहिल्याबाई ह्या एकमेवच. भारतभरातील अनके तीर्थ क्षेत्रे दुरुस्त करणे, नवीन मंदिरे आणि घाट समाजाकरिता उभारण्याचे आणि विशेषतः कशी विश्वेश्वराचे मंदिर दुरुस्त करण्याचे कार्य केले नगर जिल्ह्याच्या या लेकीने. त्यांच्या इतके कार्य खचितच एखाद्या राजाने केले असेल. अखंड भारतात त्यांनी जी नवनिर्मिती केली.
मग मनात हा विचार येतो कि सृजन, उच्चाटन आणि पुनर्निर्मिती करणाऱ्या या स्त्रियांना साथ त्या काळातील पुरुषांनी कशी दिली असेल? पती, मुलगा, सासरे हाताखाली कार्य करणारे सैनिक, कारकून, शेतकरी एक ना अनेक. एवढा समाज मागे कसा उभा राहिला ? कि आपल्यासमोर चुकीच्या पद्धतीने आपल्याला आपला इतिहास सांगितला. फेमिनिझमचे उत्तम उदाहरण दुसरे कोण असेल ? स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि ते राखण्यासाठी त्याग करावा लागतो , जबाबदारीने पुढे उभे राहावा लागते. समृद्धी प्रदान करणाऱ्या, कला आणि साहित्यात नवनिर्मिती करणाऱ्या व वेळप्रसंगी दुष्टांना धडा शिकविणाऱ्या लक्ष्मी, सरस्वती आणि काली माता आपल्यात प्रत्यक्षात होत्या. अशा प्रकारची ऊर्जा समाजात निर्माण करणाऱ्या माता आणि देवी स्वरूपच नाहीत का ! मग आपल्या देशाला स्त्री स्वातंत्र्याच्या संकल्पना पश्चिमेच्या मोजपट्टीवर आयात का कराव्या लागतात ?
नर्मदा तटावरील अहिल्याबाईनीं निर्मिलेला महेश्वर घाट : मध्य प्रदेश
नऊवारीत आयुष्य काढणाऱ्या या तिघी. महाराणी अहिल्याबाई तर सिंहासनावर घोंगडे टाकून निरपेक्षवृत्तीने राज्यशकट हाकीत होत्या. तरीदेखील त्यांचा दरारा भारतभर होता. ज्यांच्या मध्ये खरेच श्रीमंती असते त्यांना ती मिरवण्याची गरज पडत नाही. आजही महेश्वरचा घाट असो, काशीतील मंदिरे असो किंवा दक्षिणेतील मंदिरे यांना बांधणे, दुरुस्त करणे हे त्यांच्यामुळे शक्य झाले. अहिल्याबाईची श्रीमंती आपल्या सर्वांना प्रसन्नता देते. थकलेल्या यात्रिकाला आरामासाठी सावली देते.त्यांच्या इतके कार्य खचितच कोणी केले असेल. स्त्रीशक्तीचे अजून चांगले उदाहरण ते काय ! जर ताराराणीने औगंझेबाचा निःपात केला नसता तर सर्व दक्षिण भारत हा मुघलांचा झाला असता. स्त्रीच्या क्रोधाला योग्य दिशा देऊन समाजाच्या कल्याणाचे अजून मोठे उदाहरण कोठे आहे ? जर जिजाऊनीं म्हंटले असते नको किमान माझा धाकटा मुलगा माझ्याजवळच सुखात राहावा आणि माझ्या म्हातारपणाची काठी व्हावा. करोडो भारतवासीयांनी त्यांचे म्हातारपण कधीच पहिले नसते. खानदान हे कर्तृत्वाने निर्माण होतात आडनावाने तर मुळीच नाही हे त्यांनी अखंड भारतात स्वतःला वरचढ समजणाऱ्या क्षत्रिय राजांना दाखवून दिले.
बिरोबा जत्रेतील भाऊ आणि बहीण : घोड्यांच्या शर्यतीसाठी
या तिघी तक्रार करीत बसल्या नाही पण आपल्या आयुष्यातून प्रेरणा मात्र देऊन गेल्या. आपण त्यांचे वंशज आहोत. त्यांच्या सोबत अनेक स्त्रियांनी आपल्यासमोर डोंगरभर आदर्श ठेवलेला आहे. जगातील कुठल्याही दुष्ट शक्तीला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेस पुरुष योध्दाच पाहिजे असे नाही. पण प्रत्येक योध्यास एक आई मात्र नक्कीच हवी. समाजास मुलगी हवी. स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरातील ऊर्जा तेवढीच असते फरक असतो तिचा वापर कसा करायचा. जिजाऊने बाळ शिवबाला गोष्टी सांगून मनात स्वराज्याचा संकल्प रुजवून घडविला.आज एक आई आपल्या मुलीला संध्याकाळी कुठली गोष्ट सांगत असेल ? या गोष्टींवरूनच पुढचा इतिहास घडणार आहे.
लेखक : योगेश कर्डीले
Kommentare